इच्छुकांचा सात-बारा गोळा करून फायनल करणार उमेदवारी…
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची टप्याटप्याने घोषणा होत असल्याने राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप व ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे.
गेल्या काही दिवसापासून भाजपकडून या निवडणुकीसाठी मायक्रो प्लॅनिंग केले आहे. त्यामुळेच भाजपने 227 वार्डामध्ये पॅटर्न ठरवला आहे. 227 वॉर्डमध्ये त्यासाठी भाजपने ‘निरीक्षकां’ची फौज तैनात केली आहे.
या निवडणुकीत प्रस्थापितांना आव्हान देण्यासाठी कोणाला उमेदवारी? दिली जाणार हे ठरवण्यासाठी पक्षाने मुंबईतील 227 वॉर्डमध्ये निरीक्षक नेमले आहेत. त्यामुळे मुंबईतील भाजपच्या (BJP) माजी नगरसेवकांचे आता रिपोर्टकार्ड तयार केले जाणार आहे, यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
मुंबई महापलिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी भाजपने प्लॅनींग केले आहे. त्यासाठीच भाजपने उमेदवार निवडीचा नवा पॅटर्न निश्चित केला आहे. यानुसार, गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारी दिली जाणार आहे. या निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठीच भाजपने रणनीती आखली आहे. मुंबईतील 227 वॉर्डमध्ये निरीक्षक नेमले असून, मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकांचे आता रिपोर्टकार्ड तयार केले जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीप्रमाणेच माजी नगरसेवकांच्या कामाचे सखोल मोजमाप यावेळी केले जाणार आहे. या मूल्यांकन प्रक्रियेत वॉर्डमध्ये केलेली कामे, त्यांची परिणामकारकता, भाजपने दिलेले कार्यक्रम पूर्ण केले आहेत की नाही आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न यावर भर दिला जाणार आहे. त्यासोबतच प्रभागात सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानुसार उमेदवार ठरवला जाणार आहे.
लोकप्रियता, प्रतिमा तपासणार
त्याशिवाय उमेदवाराची नागरिकांमध्ये असलेली लोकप्रियता, प्रतिमा देखील तपासली जाणार आहे. ज्या माजी नगरसेवकांची कामगिरी समाधानकारक नसेल किंवा जे निष्क्रिय आढळतील, त्यांना उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता अधिक आहे. या नवीन धोरणामुळे तरुण आणि सक्षम उमेदवारांना संधी मिळू शकते. प्रत्येक वॉर्डसाठी तीन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, जे उमेदवारांची सखोल तपासणी करतील. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


