ज्याकुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील व्यक्तींसाठी सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गंत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा होतात.
ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. मात्र या योजनेमुळे सध्या मोठा आर्थिक ताण हा सरकारच्या तिजोरीवर पडताना दिसत आहे. सरकारने ही योजना सुरू करताना काही अटी देखील घातल्या होत्या, मात्र त्यामध्ये बसत नसताना देखील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे.
त्यामुळे आता अशा महिलांची नावं या योजनेतून कमी करण्यासाठी तसेच राज्याच्या तिजोरीवरील भार हलका करण्यासाठी सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केवायसी सुरू केली आहे. केवायसी केलेल्या लाभार्थी महिलांनाच इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार आहे, असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. केवायसीमुळे या योजनेसाठी किती महिला पात्र आहेत याचा खरा आकडा समोर येण्यास मदत होणार आहे, त्यामुळे ज्या महिला या योजनेमध्ये बसत नाहीत, त्यांचं नाव या योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता आहे. तसेच यापूर्वी देखील ज्या महिला या योजनेत बसत नव्हत्या त्यांची नाव कमी करण्यात आली आहेत, यावरून आता विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे ही योजना आणखी काही दिवसांमध्ये बंद होणार आहे, अशी देखील चर्चा सुरू आहे.
विरोधकांच्या या टीकेला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे, ते पुण्यात बोलत होते. कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. राजकारणात शब्दाला महत्व आहे. काही लोक राजकारणासाठी शब्द देतात पण आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाहीत, सत्तेची खुर्ची पाहून रंग बदलणारे आमचे हिंदुत्व नाहीये, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे.


