ऑस्ट्रेलिया सरकारने लहान मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल उचलत 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर संपूर्ण बंदी घालण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी सांगितले की, हा निर्णय मुलांच्या मानसिक आरोग्य आणि त्यांच्या विकासाचे संरक्षण करण्यासाठी अत्यावश्यक आहे. हा नवीन कायदा डिसेंबर 2025 पासून देशभरात लागू होणार आहे.
काय आहे हा नवा कायदा?
ऑस्ट्रेलिया सरकारने “ऑनलाइन सेफ्टी अमेंडमेंट (सोशल मीडिया मिनिमम एज) बिल 2024” संसदेपुढे सादर केले आहे. या कायद्यानुसार, 16 वर्षांपूर्वी सोशल मीडिया वापरणे बेकायदेशीर ठरेल. त्यामुळे कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 16 वर्षांखालील मुलांना अकाउंट वापरणे किंवा नव्याने उघडणे हा कायद्याचा भंग मानला जाईल. सरकारच्या मते, हा कायदा इंटरनेटवरील वाढत्या धोका, सायबरबुलिंग आणि डिजिटल व्यसनापासून मुलांना वाचवण्यासाठी करण्यात आला आहे.
कोणकोणत्या प्लॅटफॉर्मवर लागू होईल बंदी ?
नव्या नियमानुसार, Facebook, Instagram, TikTok, Snapchat, X, YouTube, Reddit, Kick आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी लागू असेल. या कंपन्यांना वय ओळखण्यासाठी मजबूत तंत्रज्ञान लागू करणे बंधनकारक असेल. जर 16 वर्षांखालील युजर या प्लॅटफॉर्मवर आढळला, तर ते थेट कायद्याचे उल्लंघन समजले जाईल.
पंतप्रधान अँथनी अल्बनीज काय म्हणाले?,
“हा कायदा आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे. डिजिटल जग त्यांच्या मानसिक आरोग्याच्या किंमतीवर चालू नये. सरकारचे उद्दिष्ट इंटरनेटला मुलांसाठी शैक्षणिक आणि मनोरंजक साधन ठेवण्याचे आहे, पण ते त्यांच्या आरोग्यासाठी धोका बनू नये, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


