भाजप नेत्याच्या ऑफरने खळबळ…
आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. शेतकऱ्यांना सवयच लागली आहे, अशी मुक्ताफळे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उधळली होती.
त्यावरून राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. विखे पाटील यांनी नंतर सारवासारव करत आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचं म्हटलं होतं. मात्र, हा वाद थांबताना दिसत नाहीये. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी तर राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. तर बच्चू भाऊंचं तोंड काळं करा आणि दोन लाख रुपये घेऊन जा, अशी ऑफरच भाजप नेत्याने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सुरू झालेला संघर्ष आता आणखी पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. या वक्तव्याचा निषेध करत, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांनी थेट विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून आता विखे पाटील समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना काळे फासणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
अहिल्यानगरमध्ये पाय ठेवू देणार नाही
विखे समर्थक आणि भाजपचे ओबीसी जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांना हा थेट इशारा दिला आहे. विखेंची तिसरी पिढी समाजकार्यात आहे. त्यामुळे कडू यांनी त्यांच्याबद्दल बोलताना तोंड सांभाळावे. अमरावतीचे पालकमंत्री असताना कडू स्वतः अनेक कामांसाठी विखेंकडे येत होते. यापुढे जपून न बोलल्यास अहिल्यानगर जिल्ह्यात पाय ठेवणे मुश्किल होईल, असा थेट इशारा दादासाहेब सोनमाळी यांनी दिला आहे. यामुळे दोन्ही नेत्यांमधील आणि त्यांच्या समर्थकांमधील हा संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे.
बच्चू कडूंनी भान ठेवावं
दरम्यान, या प्रकरणावर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विखे पाटील यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. त्यामुळेच बच्चू कडू यांनी तसं विधान केलंय. पण ज्येष्ठ नेत्याबद्दल बोलताना बच्चू कडू यांनी भान ठेवलं पाहिजे. असं बोलणं योग्य नाही. चिथावणीखोर विधानं करणं संयुक्तिक नाही. आम्ही संयमी राजकारणी आहोत. आम्ही कुठेही कायदा हातात घेतला नाही. प्रत्येक परिस्थितीला आम्ही सामोरे गेलो आहोत, असं सुजय विखे यांनी म्हटलं आहे.
संयमाने घ्या, वाद संपवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबद्दल सविस्तर भाष्य केलं आहे. त्यानंतरही कर्जमाफीबद्दल संशय घ्यावा हे योग्य नाही. मला एका कार्यकर्त्याने क्लिप पाठवली. बच्चू कडू यांच्यासोबतच्या संवादाची ही क्लिप होती. मला वाटतं हा वाद आता संपला पाहिजे. वाद काढून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. विखे पाटील यांनीही हा वाद सोडून दिला आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही आता संयमाने घ्यावं ही माझी विनंती आहे. आपल्याला शेतकऱ्यांसाठी लढायचं आहे. आपला उद्देशच तो आहे. त्यामुळे वाद संपला पाहिजे, असं आवाहन सुजय यांनी केलं.
तर रिॲक्शन होईल…
मी काहीही बोललो तर रिॲक्शनला काऊंटर रिॲक्शन होईल. त्यामुळे असं बोलू नका. त्याचे वेगळे प्रतिसाद उमटतील. कधी कधी भावनेच्या आहारी गेलेल्या कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणताना त्रास होतो. आता निवडणुका आल्या आहेत. तुम्हाला भरपूर मटेरिअल मिळणार आहे. त्यामुळे आताच वातावरण पेटवू नका, असंही ते म्हणाले.
तीन लाख देणार
दरम्यान, लोणी येथील प्रतिम कदम यांनी बच्चू कडू यांना प्रतिआव्हान दिलं आहे. बच्चू कडू यांची गाडी फोडेल किंवा त्यांना त्यांना काळे फासणाऱ्यांना मी तीन लाख रुपये देणार आहे. विखे पाटील यांनी 208 शेतकऱ्यांची मुलं दत्तक घेऊन त्यांचं संगोपन केलं आहे. मीपण शेतकरी आहे. पण बच्चू कडू तुमच्यासारखा सधन शेतकरी नाही. तुम्ही विखे पाटील यांच्याविरोधात बेताल विधान करायला नको होतं, असं प्रतिम कदम यांनी म्हटलं आहे.


