अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मोठी तयारी सुरु केली आहे.
पक्षात संघटनात्मक बदल देखील करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी परिपत्रक काढत 17 जणांनी प्रवक्तेपदी निवड केली आहे. विशेष म्हणजे नव्या प्रवक्त्यांच्या यादीत रुपाली ठोंबरे पाटील आणि अमोल मिटकरी यांचं नाव नाही. त्यामुळे दोघांना प्रवक्तेपदावरुन हटवल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, नमस्कार जय महाराष्ट्र ….मी आज पुण्याच्या बाहेर आहे,प्रवासात असल्याने माझा संपर्क होऊ शकला नाही. आज पक्षाने नव्याने प्रवक्त्याची नेमणूक केली आहे.त्यात माझ्यासह आमदार श्री.अमोल भाऊ मिटकरी,सौ.वैशालीताई नागवडे यांची नावे नाहीत. आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरे जाणार सज्ज आहोत. पक्षाचे काम जोमाने करणार आहोत.या यादी बद्दल मा.अजितदादाना कल्पना आहे नाही या विषयी देखील माहिती घेत आहे.लवकरच सविस्तर बोलेल. धन्यवाद.
राष्ट्रवादीने नेमणूक केलेल्या प्रवक्त्यांची यादी
अनिल पाटील
रुपाली चाकणकर
ब्रिजमोहन श्रीवास्तव
चेतन तुपे
आनंद परांजपे
अविनाश आदिक
सना मलिक
राजलक्ष्मी भोसले
सुरज चव्हाण
हेमलता पाटील
प्रतिभा शिंदे
विकास पासलकर
राजीव साबळे
प्रशांत पवार
श्याम सनेर
सायली दळवी
शशिकांत तरंगे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारीला सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या ठिकाणी राजकीय फायद्याची संधी दिसेल, त्या ठिकाणी मित्र पक्षांसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर लढवल्या जातात, असं वरिष्ठ नेतेमंडळी वारंवार सांगत असतात. त्यामुळे महायुती असो किंवा महाविकास आघाडी तिन्ही पक्षांची आघाडी कोणत्या तालुक्यांत टिकून राहते आणि कुठे फूट पडते, हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.


