ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
ठाणे (20) : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या वतीने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेतील नियम, खर्च मर्यादा तसेच कायदेशीर तरतुदींविषयी सर्व राजकीय पक्षांना मार्गदर्शन करण्यात आले.
ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे,आचारसंहिता पथकाचे प्रमुख उपायुक्त् भालचंद्र बेहरे, उपजिल्हाधिकारी वैशाली लंभाते, तहसीलदार प्रिया जांभळे-पाटील, उमेदवारी खर्च व हिशेब तपासणी पथक प्रमुख दिलीप सूर्यवंशी तसेच सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक उमेदवारासाठी निवडणूक खर्चाची कमाल मर्यादा रु. 13 लाख निश्चित करण्यात आली असून, या मर्यादेचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रचारासाठी वापरण्यात येणारे बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्स, वाहनांवरील जाहिराती, सभा, रॅली, ध्वनिक्षेपक, सोशल मीडिया प्रचार तसेच मुद्रित साहित्याचा खर्च या मर्यादेतच समाविष्ट असणार आहे. तसेच उमेदवारांनी परवानगी घेवूनच रॅली, सभा यांचे आयोजन करावे असे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी नमूद केले.
आदर्श आचारसंहिते अंतर्गत सरकारी यंत्रणा, कर्मचारी, वाहने व मालमत्तेचा प्रचारासाठी वापर करण्यास मनाई असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच, धार्मिक, जातीय, समाजात तेढ निर्माण करणारे भाषण, मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आमिषे, भेटवस्तू किंवा रोख रक्कम वाटप यावर पूर्णतः बंदी असल्याचेही उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी यांनी सांगितले.
तसेच, उमेदवारांनी स्वतंत्र खर्च नोंदवही ठेवणे आवश्यक असून, प्रत्येक खर्चाचे पावतीसह तपशील वेळोवेळी निवडणूक प्रशासनास सादर करणे बंधनकारक आहे. खर्च नोंदवहीची तपासणी खर्च निरीक्षकांच्या माध्यमातून केली जाणार असून, खर्च मर्यादेचा भंग झाल्यास संबंधित उमेदवारावर कायदेशीर कारवाई, अपात्रतेची शिफारस तसेच गुन्हा दाखल होण्याची तरतूद असल्याची माहिती उमेदवारी खर्च व हिशेब तपासणी पथक प्रमुख दिलीप सूर्यवंशी यांनी दिली.
सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील प्रचारासाठी माध्यम प्रमाणीकरण व निरीक्षण समिती (MCMC) मार्फत पूर्वमंजुरी घेणे आवश्यक असून, आक्षेपार्ह अथवा खोटी माहिती प्रसारित केल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल, असेही बैठकीत सांगण्यात आले.
ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता 15 डिसेंबर 2025 रोजी लागू झाली असून ती 16 जानेवारी 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यत लागू असल्याचे सांगत निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासनास पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी केले.
