बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातील सगळ्यात मोठी बैलगाडी शर्यत सांगलीच्या बोरगाव मध्ये आयोजित करण्यात आली होती. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी या देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते.
मानाची फॉर्च्युनर पटकावण्यासाठी हजारो बैलगाड्या बोरगाव येथील कोड्याच्या माळराणावर दाखल झाल्या होत्या. या शर्यतीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी आमदार शहाजीबापू पाटील हेही उपस्थित होते. हेलिकॉप्टर बैज्या व ब्रेक फेल बैलजोडीने हे मैदान मारत मानाची फॉर्च्युनर पटकावली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
हेलिकॉप्टर बैज्या व ब्रेक फेल बैलजोडीने मारले मैदान
देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचे मैदान हेलिकॉप्टर बैज्या व ब्रेक फेल बैलजोडीने मारले आहे. ही बैलजोडी श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीची मानकरी ठरली आहे. कोल्हापूरच्या शिरोळचे बाळू दादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैज्या आणि सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेअरीचा ब्रेक फेल बैलजोडीने फॉर्च्युनर गाडी जिंकली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बक्षीस वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती चंद्रहार पाटलांनी दिली आहे.
थार, फॉर्च्युनर, 150 टू-व्हीलर
या बैलगाडा शर्यतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. महिला बैलगाडा शर्यत हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. आता 100 महिलांना गोवंश संवर्धनासाठी गायी दिल्या जाणार आहेत. तसेच विजेत्यांसाठी थार, फॉर्च्युनर, 150 टू-व्हीलर आणि ट्रॅक्टर अशा कोट्यवधी रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. यातील मानाची फॉर्च्युनर हेलिकॉप्टर बैज्या व ब्रेक फेल बैलजोडीने पटकावली आहे. या पुढच्या बैलगाडी शर्यतीसाठी बीएमडब्ल्यू गाडी असणार असल्याचे चंद्रहार पाटील यांनी जाहीर केले आहे.
मैदानाला जत्रेचे स्वरूप
सांगलीच्या बोरगावमधील या शर्यतीसाठी राज्यभरातील अनेक शर्यतप्रेमी हजर होते. बैलगाडी शर्यतींच्या मैदानाच्या आसपास अनेक स्टॉल्स देखील लावण्यात आले होते. एखाद्या गावात भरलेली जत्रा जशी दिसते, त्या पद्धतीचं स्वरूप या बैलगाडी शर्यतीच्या मैदानाला आले होते. एकनाथ शिंदे यांनी या शर्यतीबाबत बोलताना म्हटले होते की, ‘आज येथे धुरळा उडाला आहे. रेकॉर्ड ब्रेक बैलगाडी शर्यत या ठिकाणी भरवली आहे. एखाद्या फिल्मस्टारला जेवढी गर्दी होत नाही. तेवढी गर्दी माझ्या या लाडक्या बैलांना पाहण्यासाठी येथे झाली आहे. ज्या बैलांनी भाग घेतला आहे. ते आपले सेलिब्रिटी आहेत.


