राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मध्यंतरी सिडकोचे अध्यक्ष असताना संजय शिरसाट यांनी सिडकोची पाच हजार कोटींची बाजारमूल्य असलेली जमीन नियमबाह्यरित्या बिवलकर कुटुंबाच्या घशात घातल्याचा आरोप केला होता.
त्यानंतर पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी भाजपा खासदार तथा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. तर कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव समोर आले. याप्रकरणी रोहित पवार महायुती सरकारवर वारंवर टीका करताना दिसत आहेत. त्यांनी आज पुन्हा एकदा महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.
रोहित पवार यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, देवेंद्र फडणवीस सरकार घोटाळ्यांनी बरबटलेलं असून यंत्रणा, न्यायव्यवस्था आणि जनता यांची कोणतीही भीती या निगरगट्ट सरकारला राहिलेली नाही. कोळसा देखील लाजेल असे काळे कारनामे या सरकारचे आहेत. जेव्हा या सरकारच्या काळ्या कारनाम्यांची श्वेतपत्रिका निघेल तेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद होईल, अशी टीका त्यांनी केली आहे.
रोहित पवार म्हणाले की, परप्रांतीय दलाल आणि कंत्राटदारांना हाताशी धरून मलिदा खाल्ला जातोय. पुणे, मुंबई, नवी मुंबई आणि गडचिरोली हे या सरकारचे मलिदा खाण्याचे हॉटस्पॉट आहेत. पुण्यात सरकारी जमिनी, मुंबईत एसआरएच्या जमिनी, नवी मुंबईत वन खात्याच्या जमिनी तर गडचिरोलीत खाणपट्टे, हे या सरकारचं आवडतं खाद्य आहे. सुलतान मिर्झाने ज्या प्रमाणे मुंबई गुंडांमध्ये वाटली होती, त्याप्रमाणे तिन्ही पक्षांनी शहरे आणि विभाग वाटून घेतले आहेत. तिन्ही पक्ष भ्रष्टराचाराने बरबटलेले असून एकमेकांना सांभाळून घेत आहेत. हे सर्व बघता “करून वोटचोरी सुरूय महाराष्ट्राची लुटमारी, असंच म्हणावं लागेल, अशा शब्दात रोहित पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.


