राजधानीत घडामोडी वाढल्या !
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला आहे. एका कारमध्ये झालेल्या या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 30 पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले आहेत.
तसेच अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आङे. या घटनेनंतर सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच अमित शाह हे जखमींची विचारपूस करण्यासाठी देखील रुग्णालयात पोहोचले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ह्युंदाई I20 कारमध्ये स्फोट झाला – शाह
गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची माहिती देताना म्हटले की, ‘आज सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास, दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर एका ह्युंदाई I20 कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात जवळून जाणाऱ्या काही लोकांना दुखापत झाली आहे आणि वाहनांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालात असे दिसून आले आहे की काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांतच दिल्ली गुन्हे शाखा आणि दिल्ली विशेष शाखेच्या पथके घटनास्थळी पोहोचली.’
घटनेची सखोल चौकशी केली जाणार – शाह
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, ‘NSG आणि NIA पथकांनी एफएसएलसह आता सखोल तपास सुरू केला आहे. जवळील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मी दिल्ली सीपी आणि विशेष शाखेच्या प्रभारींशीही बोललो आहे. दिल्ली सीपी आणि विशेष शाखेचे प्रभारी घटनास्थळी हजर आहेत. आम्ही सर्व शक्यतांचा शोध घेत आहोत आणि सर्व शक्यता विचारात घेऊन सखोल चौकशी करू. या घटनेची त्वरित चौकशी केली जाईल आणि त्यानंतर आम्ही निकाल जनतेसमोर सादर करू. मी लवकरच घटनास्थळी जाईन.
पुणे-मुंबईत हायअलर्ट जारी
दिल्लीतील या घटनेनंतर उत्तर प्रदेश, हरियाणासह देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे आणि मुंबईतही हायअलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. देशात इतर ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.


