निवडणूकीत प्रतिष्ठा पणाला…
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोमवारी ऐनवेळी अनेक घडामोडी घडल्या. मातब्बर नेत्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांचा पुन्हा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका महत्वाची ठरली. मात्र, दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचा शिलेदार अजूनही निवडणुकीच्या रिंगणात आहे.
अमोल काळे यांच्या निधनानंतर अजिंक्य नाईक यांच्याकडेच मागीलवर्षी अध्यक्षपद आले होते. मात्र, त्यावेली निवडणूक झाली होती. या निवडणुकीतही नाईक यांना शरद पवार आणि फडणवीसांचे पाठबळ मिळाले होते. त्याचीच पुनरावृत्ती यावेळीही झाली.
अध्य़क्षपदासह उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार प्रसाद लाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य काही जणांनीही अर्ज भरले होते. पण अर्ज मागे घेण्याच्या एक-दोन तास आधी घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर अजिंक्य नाईक वगळता इतर सर्वांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे नाईक यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
अध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली असली तरी उपाध्यक्ष, सचिव, सह सचिव आणि खजिनदार या प्रमुख पदांसाठी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक १२ नोव्हेंबरला आहे. त्यामध्ये सर्वाधिक लक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे असणार आहे. या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड आणि नवीन शेट्टी हे दोन उमेदवार समोरासमोर आहेत. उपाधयक्षपदासाठी लाड आणि नार्वेकर यांनीही अर्ज भरला होता. मात्र, दोघांनीही माघार घेतली. आव्हाड यांच्यासाठी त्यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे.
आव्हाड यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. ते पहिल्यांदाच या पदासाठी निवडणूक लढवत आहेत. आव्हाड यांच्यासाठी शरद पवार आणि फडणवीस यांच्याकडूनही ताकद लावली जाणार असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांनी या निवडणुकीत फडणवीस राजकारण आणणार नाहीत, अशी गुगली टाकली होती. त्यानंतरच अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे संकेत मिळाले होते. आता उपाध्यक्षपदासाठीही जितेंद्र आव्हाड यांना भाजपचा गट सहकार्य करण्याची दाट शक्यता आहे.


