हे अत्यंत बेजबाबदार…
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवांवर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जे काही घडतंय ते अक्षम्य आहे, असं त्यांनी म्हटलंय. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर त्यांनी यासंदर्भात पोस्ट लिहित फेक न्यूज देणाऱ्यांना फटकारलं आहे.
89 वर्षीय धर्मेंद्र यांची सोमवारी दुपारपासून तब्येत नाजूक असल्याचं म्हटलं जात होतं. तर आज (मंगळवार) सकाळपासूनच त्यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. या अफवांवर आधी मुलगी ईशा देओलने पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर आता हेमा मालिनी यांचा पारा चढला. धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं हेमा मालिनी यांनी सांगितलं आहे.
हेमा मालिनी यांची पोस्ट-
‘जे काही घडतंय ते अक्षम्य आहे. जी व्यक्ती उपचारांना प्रतिसाद देत आहे आणि बरी होत आहे त्यांच्याबद्दल जबाबदार चॅनेल्स अशा खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेचा योग्य आदर करा,’ अशा शब्दांत त्यांनी फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर राग व्यक्त केला आहे.
धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास जाणवल्याने गेल्या काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती. इतकंच नव्हे तर ते व्हेंटिलेटरवर असल्याचंही म्हटलं गेलं होतं. हेमा मालिनी, सनी देओल आणि मुलगी इशा देओल हे धर्मेंद्र यांच्याबरोबर रुग्णालयात असल्याचं कळतंय. देओल कुटुंबीयांच्या खासगीपणाचा आदर करावा, असं आवाहन त्यांच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.


