200 पोलीस रात्रभर तपास; दिल्ली स्फोटामागील इनसाइड स्टोरी समोर…
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या i20 कारमधील स्फोटाच्या घटनेमुळे देशात खळबळ उडाली आहे. या स्फोटामुळे ९ जणांचा बळी गेला असून ३० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटाच्या तपासासाठी दिल्ली पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत.
लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ घडलेल्या या स्फोटाचा तपास आता वेगाने सुरू झाला आहे. याप्रकरणी १३ संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, सध्या दिल्ली पोलीस बदरपूर बॉर्डरपासून लाल किल्ल्यावरील सुनहरी मशिदीच्या पार्किंगपर्यंत तसेच आऊटर रिंग रोडपासून काश्मिरी गेटमार्गे लाल किल्ल्याच्या मार्गावरील अनेक सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली आहे. आतापर्यंत २०० पोलीस कर्मचाऱ्यांनी विविध मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे.
१३ लोक संशयित म्हणून ताब्यात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जवळपास १३ लोकांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संदर्भातही तपास सुरु आहे. डॉक्टरांच्या मते, तो व्यक्ती फरिदाबाद मॉड्यूलशी संबंधित असलेला आणि I20 कारमध्ये असण्याची शक्यता आहे. मात्र, मृत्यू नेमका कोणाचा झाला, हे डीएनए अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, असेही सूत्रांनी सांगितले.
एक गाडी, पण कनेक्शन तीन राज्यांशी
यासोबतच हरियाणातील गुरुग्राम येथील मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत होती. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. सलमानने चौकशीत सांगितले की, त्याने ती कार दिल्लीतील ओखला भागातील देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली होती. त्यानंतर ती कार आणखी काही लोकांना विकली गेल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे या कारच्या मालकीचे अनेक दुवे सापडले असून त्याचे हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि दिल्ली या तीन राज्यांशी असलेले कनेक्शन समोर आले आहे.
कसून चौकशी सुरु
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारच्या मालकीचे व्यवहार बनावट कागदपत्रांच्या आधारे झाले असावेत, अशी शक्यता आहे. या तपासात या i20 कारचे कनेक्शन जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील एका रहिवाशाशी असल्याचे उघड झाले आहे, ज्यामुळे या हल्ल्यामागे दहशतवादी हल्ला असण्याचा संशय बळावला आहे. सध्या तपास यंत्रणा या दिशेने कसून चौकशी करत आहेत.


