रत्नागिरीत भाजप व शिवसेना शिंदे गटाचा वाद आता शिगेला पोहचला आहे. सिंधुदुर्ग मध्ये दोन्ही शिवसेना एकत्रीत लढण्याचा वाद रत्नागिरी पर्यत येवून पोहचला आहे. शिवसेनेची खुम खुमी मिटवायची आमची तयारी आहे, असे प्रती आव्हान मंत्री नीतेश राणे यांनी दिल्याने रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीकडून एकत्रीत निवडणुका लढविण्याची शक्यता आता धूसर झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुकीच्या तोंडावर भाजपा व शिवसेना शिंदे गटाकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. खासदार नारायण राणे व मंत्री नीतेश राणे यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात उघड उघड संघर्ष सुरु केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी महायुती म्हणून एकत्रीत निवडणुका लढण्याचे सांगितले असले तरी जिल्ह्यात भाजपला हे मान्य नाही. भाजपा व शिवसेना नेत्यांमध्ये आता जागा वाटपावरुन संघर्ष सुरु झाला आहे.
त्यात मंत्री नीतेश राणे यांनी जर भाजपच्या कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक जागा वाटपात मान मिळत नसेल तर भाजपचे कार्यकर्ते आपल्या पद्धतीने काम करतील, असे सांगून वादावर तेल टाकण्याचे काम केले आहे. त्यांनी सांगितले की, खासदार नारायण राणेंच्या निवडणुकीच्या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनीच काम केल्यामुळे खासदार नारायण राणे निवडून आले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांना एक जागा देतो, दोन जागा देतो, तसेच सुक्या धमक्या किंवा खुम खुमी कोणाला काढायची असेल तर आम्ही तयार आहोत, असाही इशारा राणे यांनी दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाची ताकद ही २०१९ पासून २०२४ मध्ये भरपूर वाढलेली आहे. गावागावांमध्ये आमचे असणारे कार्यकर्त्यांच जाळ व आमचे मतदान असो सगळ्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे. रत्नागिरीतील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तसा सक्षम आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक जागा वाटप व्हावं. आम्हाला कोणी कमी लेखू नये. कोणी हलक्यात घेऊ नये, कोणी आम्हाला सुख्या धमक्या देऊ नये, कोणाला खुम खुमी काढायची असेल आणि ती मिटवायची असेल तर आम्हीही तयार आहोत, असा इशाराच राणे यांनी अप्रत्यक्ष पालकमंत्री उदय सामंत यांना दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना व भाजपामधील वाद मागील काही वर्षा पासून सुरु आहे. मात्र आता हा वाद मिटण्याचे नाव घेत नसून तो आता विकोपाला गेला आहे. जिल्ह्यात सुरु झालेल्या निवडणुकांच्या या रनधुमाळीत हा वाद आणखी विकोपाला गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीकडून या निवडणूका एकत्रीत लढवण्याची आशा धूसर झाली आहे.


