स्थानिक च्या निवडणुकांसाठी भाजपची खेळी !
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बाजी मारण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामध्ये भाजपने आघाडी घेतली असून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांपासून उमेदवारांची निवड तसेच निवडणूक रणनीतीबाबतही बैठकांचा जोरदार सत्र सुरू आहे.
या घडामोडीत आता भाजपने माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खांद्यावर पुन्हा मोठी जबाबदारी दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमळ फुलविण्यासाठी बावनकुळे यांची निवडणूक प्रमुख नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी मुंबईत झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
‘स्थानिक’ निवडणुकांच्या निमित्ताने पक्षाने पुन्हा एकदा बावनकुळे यांच्या संघटनकौशल्यावर विश्वास दाखविल्याचे मानले जात आहे. मागील काही वर्षांत बावनकुळे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात भाजपला महाराष्ट्रात सुगीचे दिवस आले होते. त्यांच्याच कार्यकाळात भाजपला विधानसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व असे यश मिळाले.
संघटनात्मक वाढीसह निवडणुकीच्या राजकारणातही पक्षाने संपूर्ण राज्यभर आपली ताकद जोमाने वाढविली आहे. त्यामध्ये बावनकुळे यांचा मोलाचा वाटा नाकारता येणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सातत्याने याचा आवर्जून उल्लेखही केला जातो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राज्य पिंजून काढले होते. इतर पक्षांतील अनेक मोठ्या नेत्यांना भाजपमध्ये आणण्यातही त्यांनी महत्वाची भूमिका निभावली.
विधानसभेतील ऐतिहासिक कामगिरीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पक्षाची ताकद कायम असल्याचे दाखवून द्यावे लागणार आहे. ही निवडणूक एकाअर्थाने भाजपसह महायुतीसाठीही प्रतिष्ठेची असणार आहे. त्यासाठी भाजपने बावनकुळे यांच्या रुपाने हुकमी एक्का बाहेर काढत विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकल्याचे मानले जात आहे.


