नाशिक महायुतीला आव्हान देण्यासाठी नाशिकमध्ये महाविकास तथा इंडिया आघाडीने मनसे समवेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवण्याचा निर्णय सोमवारी सकाळी घेतला खरा; परंतु त्यावरून राज्यातील काँग्रेसचे राजकारण तापले आहे.
बैठकीला उपस्थित राहून मनसेसमवेत आघाडीचे समर्थन करणाऱ्या प्रदेश सरचिटणीस राहुल दिवे यांना तत्काळ नोटीस काढण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतला. प्रवक्ते सचिन सावंत यांनी तर त्यांना पत्रकार परिषद सुरू असताना बाहेर येण्यास सांगितले. दरम्यान, सायंकाळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिवे यांच्यासह अन्य पदाधिकारी जाऊन भेटले त्यांनी मनसे समवेत जाण्याचा कोणताही निर्णय नसल्याचे स्पष्ट केले.
नाशिकमध्ये सोमवारी सकाळी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला माजी आमदार वसंत गिते, माकपचे डॉ. डी. एल. कराड, मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील तसेच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. राहुल दिवे, ज्ञानेश्वर गायकवाड उपस्थित होते. या बैठकीनंतर महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढणार असल्याचे सांगण्यासाठी पत्रकार परिषद सुरू होताच, काँग्रेसच्या भूमिकेबद्दल चर्चा सुरू झाली. मनसे समवेत न जाण्याचे धोरण अगोदरच काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहे. त्यामुळे प्रवक्ता सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद सुरू असतानाच अॅड. दिवे यांना फोन केला. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी इंडिया आघाडीतील पक्ष वगळता मनसे समवेत आघाडी होणार नाही, असे सांगून बैठकीस कोणालाही पाठवले नव्हते असे सांगतानाच दिवे यांना नोटीस बजावल्याचे माध्यमांना सांगितले. विजय वडेट्टीवार यांनी स्थानिक पातळीवर परिस्थिती बघून आघाडी होऊ शकते, असे वाहिन्यांना सांगितले.
ते अधिकार वरिष्ठांचेच
प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनीच स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचे अधिकार असल्याचे सांगितले होते असे सांगत अॅड. राहुल दिवे यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले, अर्थात वरिष्ठ पातळीवरून अनुकूलता असेल तरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनीही स्पष्ट केले. दुपारी ४ वाजता संगमनेर येथे दिवे आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी मनसेबरोबर जाण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, असे स्पष्ट केले.
जागावाटप कसे होणार?
मविआमध्ये काँग्रेस पक्षाने मनसेबाबत वेगळी भुमिका घेतल्याने आता जागावाटप आणि पुढील राजकारण कसे होणार याविषयी उत्सुकता आहे.


