सिन्रर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. नगर परिषद निवडणुकीसाठी सिन्नरला भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांची युती राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांना शह देणे हाच या युतीमागचा उद्देश असल्याचे दिसते.
शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे व भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी पत्रकार परिषद घेत सिन्रर नगरपरिषेदत शिवसेना -भाजपची युती राहणार असल्याची घोषणा केली. भाजपने सिन्रमध्ये उदय सांगळे, भारत कोकाटे यांचा पक्षात प्रवेश घडवून आणत आधीच कोकाटे यांची कोंडी केली होती. त्यात युतीची घोषणा करुन त्यात भर घातली आहे.
खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वात सिन्नरमध्ये नगरपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने एकजुटीने सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महाविकास आघाडी सिन्नरमध्ये प्रभावहिन आहे. त्यामुळे खरी लढत ही शिवसेना-भाजप विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यातच होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत सिन्नरला मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव यांनी स्पष्ट केलं आहे.
जिल्हाध्यक्ष बच्छाव यांनी सांगितले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार नाशिक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जात आहेत. युतीसंदर्भात निर्णय घेण्याची स्थानिक पातळीवर मुभा देण्यात आली आहे. याबाबत गेल्या सात-आठ दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यानुसार आता सिन्नरमध्ये राष्ट्रवादी सोबत आमची मैत्रीपूर्ण लढत होईल.
नगराध्यपदासाठी भाजप उमेदवार देणार असून त्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका व शिवसेना (ठाकरे गट) नगरपालिकेतील माजी गटनेते हेमंत वाजे यांचा भाजप प्रवेश होऊ घातल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री आज नाशिकमध्ये असल्याने आजच त्यांचा प्रवेश होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हेमंत वाजे हे भाजपमध्ये आल्यास इच्छुकांची संख्या वाढेल असे भाजप जिल्हाध्यक्ष बच्छाव यांनी सांगितले. तसेच आतापर्यंत सात जणांनी मुलाखती दिल्याची माहितीही त्यांनी दिली.


