थरारक घटनेची पुन्हा चर्चा; पण का ?
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद अलीकडेच आत्मघाती हल्ल्या झाला आणि त्यामुळे श्रीलंकेच्या क्रिकेट संघामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पहिला सामना जिथे झाला होता, जो स्फोटाच्या ठिकाणापासून फक्त 17 किमी अंतरावर होता.
यामुळे आता श्रीलंकन खेळाडूंनी पाकिस्तानमधील सुरक्षा परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे आणि उर्वरित सामने खेळण्यास ते इच्छुक नाहीत. खेळाडूंच्या मनात भीती कायम आहे. अशाच एक धक्कदायक प्रसंग या आधी घडला होता. 2009 मध्ये पाकिस्तानच्या लाहोर शहरात श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघावर झालेला दहशतवादी हल्ला हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात काळ्या पानांपैकी एक मानला जातो. साधारणपणे एक नियमित कसोटी सामना असलेल्या त्या दिवशी, जगाने एक भयानक प्रसंग बघितला ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दशकभरासाठी पाकिस्तानपासून दूर नेलं.
नक्की काय घडलेलं?
2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान दौरा रद्द केला होता. त्या पार्श्वभूमीवर, श्रीलंका संघाने सद्भावनेच्या हेतूने पाकिस्तानचा दौरा करण्याचा निर्णय घेतला. दोन कसोटी आणि तीन वनडे सामन्यांची मालिका या दौऱ्यांतर्गत खेळवली जाणार होती. दुसरा कसोटी सामना लाहोरच्या प्रसिद्ध गद्दाफी स्टेडियमवर सुरू होता. 3 मार्च 2009 रोजी, श्रीलंका संघ हॉटेलमधून स्टेडियमकडे येत असताना हा हल्ला झाला.
हल्ला कसा झाला?
सकाळी 8:40 वाजता, संघाची बस लिबर्टी चौकाजवळ पोहोचली असता, 12 सशस्त्र दहशतवाद्यांनी बस आणि सुरक्षा वाहनांवर अचानक हल्ला केला. त्यांनी स्वयंचलित रायफल्स, ग्रेनेड आणि रॉकेट लाँचर्सने अंधाधुंद गोळीबार केला. सुमारे 15 मिनिटे चाललेल्या या हल्ल्यात परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं. कुमार संगकारा, महेला जयवर्धने, अजंथा मेंडिस, थिलन समरवीरा, थरंगा परनविताना आणि चमिंडा वास हे खेळाडू जखमी झाले. 6 पाकिस्तानी पोलिस अधिकारी आणि 2 नागरिकांचा मृत्यू झाला. दहशतवादी मात्र घटनास्थळावरून पसार झाले आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा मागे सोडून गेले.
बसचालकामुळे अनर्थ टळला
बसचालक मेहर मोहम्मद खलील यांच्या शौर्यामुळे मोठा अनर्थ टळला. गोळीबार सुरू असतानाच त्यांनी बस थेट गद्दाफी स्टेडियमपर्यंत नेली आणि खेळाडूंचे प्राण वाचवले. सर्व खेळाडूंना तत्काळ सैनिकी तळावर हलवण्यात आलं आणि नंतर त्यांना कोलंबोला परत पाठवण्यात आलं. त्या क्षणापासून दुसरी कसोटी रद्द करण्यात आली आणि श्रीलंका संघाचा पाकिस्तान दौरा थांबवण्यात आला. संपूर्ण क्रिकेट जगताने या घटनेचा तीव्र निषेध केला आणि खेळाडूंप्रती एकजूट व्यक्त केली.
पाकिस्तानमधील क्रिकेटवर परिणाम
या घटनेचे दूरगामी परिणाम झाले. पाकिस्तानला दहा वर्षांपर्यंत कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका आयोजित करता आली नाही. जगातील प्रमुख संघांनी पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिला. पाकिस्तानने आपले ‘होम’ सामने युनायटेड अरब अमिरात (UAE) मध्ये खेळवायला सुरुवात केली. याच घटनेनंतर जगभरातील क्रिकेट बोर्डांनी सुरक्षेच्या नियमांमध्ये कडक बदल केले.
क्रिकेटचा पाकिस्तानमध्ये पुनरागमन
सुमारे 10 वर्षांनंतर, पाकिस्तानमध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतलं. 2015 मध्ये झिंबाब्वे संघाने पाकिस्तानचा दौरा केला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नवा प्रारंभ झाला. 2017 मध्ये श्रीलंका संघाने पुन्हा पाकिस्तानचा दौरा केला, ज्याने भूतकाळातील वेदनादायी आठवणींवर पांघरूण घातलं. त्यानंतर पाकिस्तान सुपर लीग आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय सामने यशस्वीपणे पार पडले.
सर्वात दुःखद आणि धक्कादायक प्रसंग
2009 मधील श्रीलंका संघावरचा हल्ला हा क्रिकेट जगतातील सर्वात दुःखद आणि धक्कादायक प्रसंग होता. त्याने केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर जागतिक क्रीडा क्षेत्रालाही सुरक्षा आणि जबाबदारीचे भान दिले. आज, अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर पाकिस्तान पुन्हा एकदा सुरक्षित ठिकाण म्हणून ओळखले जात आहे. या प्रवासात खेळाडू, चाहते आणि अधिकाऱ्यांची चिकाटी आणि निर्धार हेच खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या ‘स्पिरिट’चे प्रतीक ठरले.


