जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपने बऱ्याच ठिकाणी मित्र पक्षांना फार महत्व दिलेले नाही. अपवादात्मक ठिकाणी युती केली असली, तरी त्यातूनही स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.
अशा स्थितीत, भाजपला थेट आव्हान देऊन सर्वात आधी स्वबळाचा नारा देणारे आमदार किशोर पाटील यांना शिवसेनेने (एकनाथ शिंदे) आता मोठी जबाबदारी सोपवली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुतीच्या माध्यमातून एकत्र लढल्यानंतर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील संवाद आणि समन्वय चांगला दिसून येत होता. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणसंग्राम जवळ येताच तिन्ही पक्षांमधील मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत.
विशेषतः भाजपने बऱ्याच ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढण्याची आणि सोयीने युती करण्याची भूमिका घेतल्याने शिंदे गटात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती का होत नाही, असा सवाल भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांना यापूर्वीच केला आहे. युती न झाल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल, इतकेच नव्हे तर कार्यकर्ते मरून जातील, अशी तीव्र भावना मंत्री पाटील यांनी व्यक्त केली आहे.
महायुतीतील या तीव्र मतभेदांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीच्या तिन्ही मित्र पक्षांची भूमिका काय असेल आणि त्यांच्या संबंधांवर याचा कसा परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, शिंदे गटाचे पाचोरा-भडगाव मतदारसंघातील आमदार किशोर पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
पक्षाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील युतीसाठी प्रयत्न करत असताना, त्यांचे ते प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आमदार पाटील यांनी पाऊल टाकले. शिवसेना आणि मित्र पक्षांना संपविणे हीच भाजपची पॉलिसी असल्याचा खळबळजनक आरोप देखील काही दिवसांपूर्वी केला होता. भाजपसारख्या सर्वात मोठ्या पक्षाच्या विरोधात बोलण्याची धमक ठेवणारे आमदार पाटील त्यामुळे चांगलेच चर्चेत आले.
मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे निवडणूक प्रभारी आमदार मंगेश चव्हाण यांना शह देण्यासाठी शिंदे गटानेही आमदार किशोर पाटील यांना मोठी जबाबदारी आता सोपवली आहे. निवडणूक प्रभारींची नियुक्ती करताना शिंदे गटाने आमदार पाटील यांच्याकडे पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर नगर परिषदांसह शेंदुर्णी नगर पंचायतीची सूत्र दिली आहेत.
त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे वरणगाव, भुसावळ, धरणगाव आणि नशिराबाद नगर परिषद, आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे चोपडा, फैजपूर, यावल नगर परिषद, आमदार अमोल पाटील यांच्याकडे एरंडोल, पारोळा नगर परिषद, आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे रावेर, सावदा नगर परिषद आणि मुक्ताईनगर नगर पंचायत आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे अमळनेर नगर परिषदेचे निवडणूक प्रभारीपद सोपवले आहे.


