भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ) 2025 निमित्त पुण्यात राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र (एनसीसीएस) येथे 13 नोव्हेंबर 2025 रोजी पूर्वपीठिका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा उद्देश महोत्सवाबाबत शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि अध्यापकांना याबाबत अवगत करणे आणि एनसीसीएसच्या संशोधन उपक्रमांबाबत जाणून घेण्याची संधी त्यांना पुरवणे हा होता.
श्रीप्रसाद एमके, विभागीय आयोजन सचिव, विज्ञान भारती, पश्चिम क्षेत्र यांनी महोत्सव आणि त्यामागची संकल्पना याविषयी सांगितले. त्यांनी तार्किक आणि प्रश्न विचारणारी वैज्ञानिक मानसिकता स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारताच्या वैज्ञानिक कामगिरीचे आणि आत्मनिर्भर भारतासाठीच्या त्याच्या उपयोगाचे महत्त्व त्यांनी सांगितलं. भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवातील विविध विभागांची ओळख त्यांनी करून दिली. श्रीप्रसाद यांनी विद्यार्थ्यांना विविध सत्रांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी महोत्सवात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले.
एनसीसीएसच्या संचालक (अतिरिक्त कार्यभार) प्रा. शर्मिला बापट यांनी त्यांच्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी प्रोत्साहित केले आणि त्यांना जैवतंत्रज्ञानाच्या संकल्पनेची ओळख करून दिली. केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या BioE3 उपक्रमाची माहिती त्यांनी दिली. बापट यांनी विद्यार्थ्यांना “D.E.S.I.G.N. for BioE3” आव्हानात सहभागी होण्यास प्रोत्साहित केले. दर महिन्याला जाहीर होणारी ही स्पर्धा तरुणांना त्यांच्या काळातील महत्त्वपूर्ण समस्या सोडवण्यासाठी सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट ठेवते आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह इतर भारतीय नागरिकांसाठी खुली आहे.
त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्रामधील विविध प्रयोगशाळांना भेट दिली. यात नॅशनल सेल रिपॉझिटरी, बायोइन्फॉरमॅटिक्स, फ्लो सायटोमेट्री, बायोइमेजिंग, प्रोटिओमिक्स आणि डीएनए सिक्वेन्सिंग सुविधा आणि एनसीसीएसमध्ये आयोजित केलेल्या सूक्ष्मजीवशास्त्र मांडणीचा समावेश होता.


