राज्यातील त्रस्त तरुणाचे थेट शरद पवारांना पत्र !
अकोला: तुळशीच्या लग्नानंतर लगीनघाई केले जाते. लाखो जोडपी ही लग्नबंधनामध्ये अडकत आहेत. मात्र खेडेगावांमध्ये राहणाऱ्या तरुणांची मात्र लग्न रखडली आहेत.
शेती आणि पावसातील अनियमता यामुळे गावातील तरुणांना मुली देत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस येत आहे. या संदर्भात एका तरुणाने थेट जेष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे मदत मागितली. लग्न होत नसलेल्या तरुणाने थेट शरद पवारांना निवेदन देत माझं लग्न होत नाहीये ,मला पत्नी शोधून द्या अशी मागणी केली.
अकोल्यात शनिवारी शरद पवार यांनी शेतकरी संवाद कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी उपस्थितांपैकी काही नागरिकांनी त्यांना निवेदनं दिली. त्यामध्ये एकाकीपणा असह्य झालेल्या लग्नाळू तरुणाचे निवेदन होते. मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही’, असे साकडे घातले आहे. यामध्ये त्याने स्वत:चा पत्ता आणि मोबाईल नंबर दिले आहे. हे निवेदन वाचून शरद पवार यांच्यासह व्यासपीठावरील नेतेही अवाक झाले. या तरुणाचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
या लग्नासाठी अडचणी येत असलेल्या तरुणाने शरद पवार यांना लिहलेल्या पत्रात त्याला एकाकीपणा असह्य झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्याने म्हटले आहे की, माझे वय वाढतेय. भविष्यात माझे लग्न होणार नाही. मी एकटाच राहीन. तरी माझ्या जीवनाचा विचार करुन मला पत्नी मिळवून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरीही मी राहायला तयार आहे. तिथे चांगले काम करीन आणि संसार नीट चालवीन, याची हमी मी देतो. मला जीवनदान द्यावे. तुमचे उपकार मी विसरणार नाही, असे या तरुणाने पत्रात लिहले आहे.
बिबट्यांच्या हल्ल्यामुळे रखडली लग्ने
महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचा मुक्त वावर दिसत आहे. गावागावातील शेतशिवारांमध्ये झुंडीने फिरणाऱ्या या बिबट्यांच्या टोळीने आजपर्यंत कित्येक पशुधनावर तर हल्ला केला. याचबरोबर अंगणात खेळणार लहान मुलांवर देखील बिबटे हल्ले करत आहेत. यामुळे अनेकांचे बळीही गेले आहेत. बिबट्याच्या दहशतीचा परिणाम सामाजिक जीवनावरील झाला असून गावातील शेकडो तरुण आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर असूनही त्यांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने पालकांची चिंता मात्र वाढली आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळेही लग्नास नकार दिला जात आहे.


