DNA रिपोर्टमध्ये धक्कादायक उलगडा…
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात सोमवारी (10 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या बॉम्बस्फोटात संपू्र्ण देशाला हादरवून सोडलं. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत.
या स्फोटात जीव गमावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईक दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयाबाहेर विलाप करताना दिसून आले, हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते.
हा स्फोट डॉ. उमर उन नबी यानेच घडवून आणला हे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे. या स्फोटात 12 नागरिकांचा मृत्यू झाला असून, काही मृतांच्या शरीराचे तुकडे झाले, छिन्नविछिन्न परिस्थितीतील मृतदेह परिसरात विखुरले होते. मृतांच्या शरिराचे तुकडे काही अंतरापर्यंत फेकले गेले होते. फॉरेन्सिक पथकांनी हे सगळे अवयव गोळा करून मृतांची ओळख डीएनए चाचणीने पटवली.
स्फोटात वापरलेल्या कारमध्ये ड्रायव्हिंग व्हील आणि अॅक्सिलरेटरमध्ये एक पाय अडकून पडलेला आढळून आला होता. या व्यक्तीच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या होत्या. तो सापडलेला पाय डॉ. उमर उन नबी याचा असल्याचे डीएनए चाचणीतून निष्पन्न झालं आहे. ज्या कारमध्ये ही स्फोटकं होती, त्या कारची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा पोलिसांना या कारमध्ये ड्रायव्हिंग व्हिल आणि अॅक्सिलरेटर याच्यामध्ये फक्त एक पाय सापडला होता. हा पाय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आला होता. त्यानंतर डॉक्टर उमरची आई आणि त्याच्या भावासोबत त्याचा डीएनए मॅच करण्यात आा. डीएनए चाचणी केल्यानंतर हा पायाचा भाग डॉ. उमर उन नबी याचा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
डॉ. उमर हा फरिदाबादहून सोमवारी सकाळीच दिल्लीला पोहोचला, त्यानंतर तो दिवसभर दिल्लीत फिरत होता. यादरम्यान, तो एका मशीदितही गेला. जिथे त्याने नमाज पठण केलं. त्यानंतर तो लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये पोहोचला, तिथे त्याने तीन तास तिथे घालवले. त्यानंतर त्याने संध्याकाळी 6.19 वाजता गाडी काढली आणि संथ गतीने पुढे चालवत राहिला. त्यानंतर 6.52 वाजता हा स्फोट झाला. त्याला मध्य दिल्लीच्या परिसरात स्फोट करायचा होता, अशी माहिती आहे. त्यासाठी त्याने लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या परिसरातून गाडी काढली आणि तो मध्य दिल्लीकडे निघाला होता. मात्र, जवळच्याच सिग्नलवर स्फोटकं ट्रिगर झाली आणि तिकडेच स्फोट झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


