पण अजिंक्य नाईकांचे ‘गॉडफादर’ वेगळेच निघाले !
मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीत भाजप नेत्याने माघार घेतली. त्यानंतर अजिंक्य नाईक हे बिनविरोध अध्यक्षपदी विराजमान झाले. नाईक यांच्यासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले होते.
नाईक यांच्या अध्यक्षपदामागे आणि भाजप नेते प्रसाद लाड आणि इतर उमेदवारांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेण्यामागे शरद पवारांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.
ज्या अजिंक्य नाईकांच्या पारड्यात शरद पवारांनी आपले वजन टाकले त्या अजिंक्य नाईकांचे राजकीय कनेक्शन नेमके काय आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. नाईक यांचे ‘विरार’शी कनेक्शन असून ते विरारच्या माजी आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे सर्वोसर्वा हितेंद्र ठाकूर आणि मुंबई क्रिकेट असोशिएशनचे माजी उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांचे जावई आहेत.
माजी आमदार क्षितिज ठाकूर हे त्यांचे मेव्हणे आहेत. हितेंद्र टाकुन यांचे राजकीय वजन आणि पंकज ठाकूर यांचे मुंबई क्रिकेट असोशिएशन मधील शरद पवार यांच्या जवळच्या संबंधाचा उपयोग अजिंक्य नाईक यांना उपयोगी पडल्याचे बोलले जात आहे.
अजिंक्य नाईक यांचे मूळ गाव कोकणातील परंतु त्याचा जन्म आणि शिक्षण मुंबई मध्येच झाले .त्यांच्या कुटुंबाला राजकीय अशी ओळख नसली तरी १५ वर्षा पूर्वी अजिंक्य नाईक हे मनसेचे युवा पदाधिकारी होते. परंतु नंतर त्यांनी राजकारण सोडून समाजकार्यात आणि क्रिकेटमध्ये जास्त लक्ष दिले. त्यांचे सासरे पंकज ठाकूर ह्यांनी मुबई क्रिकेट असोशिएशन मध्ये ४ टर्म शरद पवार यांच्या बरोबर काम केले होते.
शेवटच्या टर्ममध्ये आशिष शेलार अध्यक्ष आणि पंकज ठाकूर उपाध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्या दरम्यानच अजिंक्य नाईक यांनी मुबई क्रिकेट संघटनेत प्रवेश केला होता. पंकज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाचा अजिंक्य यांना मोठा फायदा झाला आहे. वसईचे माजी आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे सर्वोसर्वा हितेंद्र ठाकूर हे ही अजिंक्य नाईक यांचे चुलत सासरे आहेत.
सचिव म्हणून कामाचा अनुभव
अजिंक्य नाईक यांनी मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव म्हणून ही काम केले आहे. संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष अमोल काळे यांच्या आकस्मित निधना नंतर अजिंक्य नाईक हे गेली दीड वर्ष अध्यक्ष होते . तर, आता ते बिनविरोधपणे मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत.


