मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला !
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजप आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूला दणदणीत यश मिळाले आहे. तर महाआघाडीचा दारुण पराभव झाला आहे.
अनेक एक्झिट पोल्सनी भाजप-जेडीयूला बहुमत मिळेल असे अंदाज मांडले होते. पण, एका मराठी माणसाच्या संस्थेचा एक्झिट पोल सगळ्याच आकड्यांच्या बाबतीत अचूक ठरला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल अभिजीत ब्रह्मनाथकर यांच्या पोल डायरीने केलेल्या एक्झिट पोलमध्ये जसा निकाल सांगितला होता, तसाच लागला आहे.
बिहार विधासभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर नितीश कुमार यांचा जदयू सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. असाच अंदाज पोल डायरीच्या एक्झिट पोलमध्ये मांडण्यात आला होता.
एक्झिट पोलमध्ये भाजप, जदयूला किती जागा सांगितल्या होत्या?
पोल डायरी एक्झिट पोलमध्ये भाजपला ८७ ते ९५ दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज मांडण्यात आला होता. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपला ९१ जागा मिळाल्या आहेत.
नितीश कुमारांच्या जनता दल संयुक्त या पक्षाला एक्झिट पोलमध्ये ८१ ते ८९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. जदयूलाही ८३ जागा मिळाल्या आहेत. जीतनराम माझी यांच्या हम पक्षालाही ५ ते ६ जागा मिळतील असे या एक्झिट पोलमध्ये म्हटले होते. त्यांनाही ५ जागा मिळाल्या आहेत.
चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाला १२ ते १६ जागा मिळण्याचा अंदाज मांडण्यात आला होता. त्यांनाही १९ जागा मिळाल्या आहेत. सर्व पक्षांच्या मिळून एनडीएला १८४ ते २०९ जागा मिळतील असा गणित पोल डायरीच्या एक्झिट पोलने मांडले होते. प्रत्यक्ष निकालामध्ये एनडीएला २०१ जागा मिळाल्या आहेत.
राष्ट्रीय जनता दल, काँग्रेसला किती जागा मिळण्याचा अंदाज?
या एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाला २० ते २७ जागा मिळण्याचा अंदाज मांडण्यात आला होता. निकालही तसाच लागला आहे. राष्ट्रीय जनता दलाला २५ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला ४ ते ८ जागा मिळण्याचा अंदाज होता. निकालात काँग्रेसला ६ जागा मिळाल्या आहेत. सर्व पक्षांच्या मिळून महाआघाडीला ३२ ते ४९ जागा मिळतील असा या एक्झिट पोलचा अंदाज होता, हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे.


