राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार का?
याबाबत उत्सुकता होती, मात्र याचं उत्तर आता समोर आलं आहे, ते म्हणजे अनेक ठिकाणी राजकीय पक्षांकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे, तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून युती आणि आघाडीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान पालघरमधून मोठी बातमी समोर येत आहे, पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटानं भाजपला मोठा धक्का दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर पालघर जिल्ह्यातील डहाणू नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात शिंदे सेनेसह सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्याने नवा राजकीय अध्याय लिहिला जात आहे. डहाणू नगर परिषद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शिंदे गट आणि अजित पवार गटासोबत हातमिळवणी केली आहे.
स्थानिक पातळीवर झालेलय्या या निर्णयाला पक्षाकडून मान्यता देण्यात आली असून, डहाणूमध्ये सुरु असलेली एकाधिकारशाही संपवण्यासाठी एकत्र आलो असल्याची प्रतिक्रिया यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक यांनी दिली आहे. दरम्यान जागा वाटप आणि उमेदवार ठरवले जात असून, सोमवारी शक्ती प्रदर्शन करून नगराध्यक्ष आणि 27 उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. डहाणूमध्ये शिंदे गट, अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या युतीला ठाकरे गट आणि माकपचा देखील छुपा पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान दुसरीकडे शुक्रवारी भाजपच्या वतीने डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा नगराध्यक्ष पादसाठी तर अन्य 27 उमेदवारांचे सदस्यपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत, यावेळी खासदार डॉ हेमंत सावरा यांची उपस्थित होती. पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी पक्षांतराला सुरुवात झाल्याचंही पहायला मिळत आहे. .सोमवारी रात्री पालघर शहरातील शिवसेना शिंदे गटातील काही महिला पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रवेश केला आहे.


