परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक; म्हणत भाजपची पोस्टरबाजी !
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दसरा मेळावा आणि बिहारच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर आता बॅनरबाजीचे राजकारण मुंबईत, विशेषत: दादर परिसरात, जोर धरू लागले आहे.
काही दिवसांपूर्वी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवाजी पार्क) परिसरात ‘ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते, जे नंतर मनसे कार्यकर्त्यांनी हटवले होते. मात्र बिहारचा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा दादर परिसरात राजकीय पोस्टरबाजी दिसून आली आहे. यावेळी हे पोस्टर भाजपकडून लावण्यात आलं आहे.
परिवाराचा नाही, मुंबईचा सेवक तोच..’
‘ठाकरेंचा सेवक तो मुंबईचा नगरसेवक’ या आशयाच्या पोस्टरला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही शिवाजी पार्क परिसरात बॅनर लावले आहेत. या बॅनरवर ‘परिवाराचा नाही, मुंबईचा सेवक तोच नगरसेवक’ असा आशय लिहून भाजपने थेट मनसे – शिवसेनेला आणि विशेषत: ठाकरे कुटुंबाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
या बॅनरमुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. मुंबईच्या राजकारणात या ‘बॅनर वॉर’मुळे आता नवा वादंग निर्माण झाला आहे.
बिहारमधील विजयानंतर मुंबईत जल्लोष
दरम्यान, बिहारमधील निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर भाजपनं महाराष्ट्रात विशेष करून मुंबईत मोठा जल्लोष केला. मुंबईतील बिहारी मतांना प्रभावित करण्यासाठी उत्सुक असलेल्या भाजपसाठी बिहारमधील विजय उत्साहवर्धक ठरणार आहे.
बिहार निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकल्या आहेत. तर नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडनं ८५ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांक पटकावला. एनडीएने बिहार निवडणुकीत २०० पेश्रा जास्त जागा जिंकत मोठी मुसंडी मारली आहे. नितीश कुमार हे जवळपास सलग पाचव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत.


