पाइपलाइन फुटल्याने रिक्षा-टॅक्सींच्या लांबच लांब रांगा…
मुंबई आणि ठाण्यात अचानक सीएनजीचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. गेलच्या मुख्य गॅस पाइपलाइनला झालेल्या नुकसानीमुळे ही समस्या उद्भवल्याची माहिती महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) दिली आहे. खराब झालेल्या पाइपलाइनमुळे वडाळा इथल्या एमजीएलच्या सिटी गेट स्टेशन (सीजीएस) इथं बराच काळ गॅस पुरवठा विस्कळीत झाला.
यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक सीएनजी पंपांवर पुरवठा थांबला. प्रभाविक झालेल्या सीएनजी पंपांमध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांना सीएनजी पुरवठा करणारे स्टेशन समाविष्ट होते. मुंबईतील अनेक सार्वजनिक वाहनं उदा. बसेस, ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी या प्रामुख्याने एमजीएलद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सीएनजीवर अवलंबून असतात. त्यामुळे सीएनजीचा पुरवठ्यातील खंडामुळे या वाहनांच्या सेवांवर गंभीर परिणाम झाला. प्रवाशांसोबतच वाहनचालकांचीही प्रचंड गैरसोय झाली.
सीएनजीसाठी लांबच लांब रांगा
अनेक पंप, विशेषत: सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांना इंधन पुरवठा करणारे पंपदेखील बंद पडले, ज्यामुळे चालकांची गैरसोय झाली. अनेक वाहनचालकांनी सीएनजीसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याची तक्रार केली आहे. तर शहरातील अनेक भागात सीएनजी स्टेशन पूर्णपणे बंद असल्याचं दिसून आलं. दरम्यान, घरगुती वापरकर्त्यांना पाइपद्वारे पीएनजीचा पुरवठा सुरू राहील, असं एमजीएलने स्पष्ट केलं. या अडचणीच्या काळात, निवासी भागातील रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पीएनजी पुरवण्याला प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा खंडीत होणार नाही.
एमजीएलने परिस्थिती सामान्य होईपर्यंत तात्पुरतं पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला व्यावसायिक ग्राहकांना दिला आहे. तर खराब झालेल्या पाइपलाइनची दुरुस्ती करण्यासाठी गेल आणि एमजीएलच्या तांत्रिक पथकांना तात्काळ तैनात करण्यात आलं आहे. आरसीएफ परिसरात पाइपलाइन खराब झाली होती, असं मत तज्ज्ञांनी नोंदवलंय.
काय म्हणालं एमजीएल?
वडाळा सीजीएस इथं पूर्ण क्षमतेनं गॅस पुरवठा पूर्ववत होताच नेटवर्कमधील दाब सामान्य होईल आणि सर्व सीएनजी पंपांवर नियमित पुरवठा पुन्हा सुरू होईल, अशी माहिती एमजीएलने दिली. यावेळी कंपनीने ग्राहकांना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे.


