सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. येत्या काही दिवसांतच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होऊन निकाल लागेल. तर त्यानंतर महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागतील.
नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ येत चालली असून त्याच पार्श्वभूमीवर अनेकांची नामांकन अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मामे भाऊ देखील पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे प्रथमच निवडणूक लढवणार असून त्यांनी अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आल्हाद कलोती यांनी नामांकन अर्ज दाखल केला.चिखलदऱ्याचा सर्वांगीण विकास हाच आपला मुख्य अजेंडा आहे, असे आल्हाद कलोती यांनी पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात असल्याने चिखलदरा नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राणा दाम्पत्याने नुकतेच आल्हाद कलोती यांचे निवासस्थानी स्वागत केले.
निवडणुकीकडे लागले राज्याचे लक्ष
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावती दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी आल्हाद यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. कलोती कुटुंबाचे सामाजिक कार्य मोठे आहे. त्यांची पार्श्वभूमी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ अशी दुहेरी ओळख असलेले आल्हाद कलोती हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असले तरी राजकारणात यांनी पहिलं पाऊल टाकल्यामुळे चिखलदरा येथे होणारी नगरपरिषदेच्या निवडणूक रंगतदार होईल हे निश्चितच. नुकताच त्यांनी त्यासाठी नामांकन अर्ज भरला, यावेळी भाजपचे अमरावती जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा यांच्यासह भाजप व युवा स्वाभिमान पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आल्हाद यांच्या नामांकनामुळे ही प्रमुख लढत ठरणार असून असून राज्याचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडेही लागलं असेलच.
आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांनी नुकतंच आल्हाद कलोती यांचे त्यांच्या निवासस्थानी स्वागत केलं. चिखलदरा हे देवेंद्र फडणवीस यांचे आवडते ‘हिल स्टेशन’ आहे. आल्हाद कलोती निवडून आल्यास इथल्या विकासाचे चित्र पूर्णपणे बदलेल असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला. चिखलदऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आल्हाद हेच योग्य उमेदवार आहेत, युवा स्वाभिमान पार्टी त्यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करेल, असंही रवी राणा यांनी नमूद केलं. तर माजी खासदार नवनीत राणा यांनीही आल्हाद कलोती हेच चिखलदऱ्यासाठी योग्य उमेदवार असल्याचं म्हटलं.


