मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे गेल्या काही दिवासांपासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मंत्री तथा अजित पवार यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे एकमेकांवर थेट टीका करताना दिसत आहेत.
मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला असा आरोप मनोज जरांगे यांनी केल्यानंतर या दोन्ही नेत्यांत उघड संघर्ष पाहायला मिळाला. धनंजय मुंडे यांनी जरांगे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळलेले आहेत. तसेच मुंडे जरांगी यांनी केलेल्या टीकेला जशास तसे उत्तर देत आहेत. माझी आणि जरांगे यांची नार्को टेस्ट करा, खरं काय ते समोर येईल, असे थेट आव्हानच मुंडे यांनी दिले होते. मुंडेंचे हे आव्हान मनोज जरांगे यांनीदेखील स्वीकारलेले आहे. असे असतानाच आता जालना जिल्ह्यातून मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे यांचा खास माणूस पोलीस ठाण्यात गेला आहे.
नेमकं काय घडतंय?
मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे यांचे जवळचे सहकारी असलेले किशोर मरकड हे जालन्याच्या पोलrस अधीक्षक कार्यालयात गेले होते. त्यांनी आज (19 नोव्हेंबर) त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत मनोज जरांगे यांची सुरक्षा काढून घेण्यात यावी अशी मागणी केली होती. याच मागणीसंदर्भात त्यांनी पोलिसांना एक अर्जही दिला आहे. 2 दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला होता. यावेळी त्यांनी माझ्या हत्येच्या कटाप्रकरणी जो तपास आहे तो थंडावल्याची शंका उपस्थित केली होती.
किशोर मरकड पोलीस ठाण्यात
यासह जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरदेखील जोरदार टीका केली होती. मला पोलीस सुरक्षा नको, असंही मनोज जरांगे यांनी बोलून दाखवले होते. त्यानंतर आता जरांगे यांचे सहकारी किशोर मरकड यांनी जरांगे यांची पोलीस सुरक्षा काढावी अशी मागणी करणारा अर्ज केला आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंडे- जरांगे यांच्यात संघर्ष का पेटला?
मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी मी खळबळजनक गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला आहे, असा थेट आरोपच जरांगे यांनी केला होता. त्यासाठी काही कथित कॉल रेकॉर्डिंगची मदत जरांगे यांनी घेतली होती. जरांगे यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी समोर येत सर्व आरोप फेटाळले होते. तसेच जरांगे यांनी केलेल्या आरोपांची सीबीआयची चौकशी करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती. तसेच मी नार्को टेस्ट करायला तयार आहे, असेही त्यावेळी धनंजय मुंडे म्हणाले होते. अजूनही या दोन्ही नेत्यांमधील वाद संपलेला नाही. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


