रवींद्र चव्हाणांच्या ‘कोअर टीम’मधील बडा नेता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल…
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच निवडणूका डोळयांसमोर ठेवून प्रवेश होत आहेत. एकीकडे महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एकीकडे इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना प्रवेश देण्याचा सपाटा लावला होता. मात्र, आता रवींद्र चव्हाण यांच्या ‘कोअर टीम’मधील बड्या नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
राज्यातील निवडणुकीपूर्वीच पक्षांतर होत असताना शनिवारी सायंकाळी भाजपच्या (BJP) काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेल्या योगेंद्र भोईर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. योगेंद्र भोईर हे डोंबिवलीतील भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते.
योगेंद्र यांच्यासोबत त्यांच्या पत्नी ट्विंकल भोईर यांनी मातोश्री येथे शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, उपनेते संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने, डोंबिवली शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. भोईर यांचा प्रवेश भाजपसाठी धक्का मानला जात आहे.
गेल्या काही दिवसापासून डोंबिवलीतील पक्ष प्रवेशाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः काही दिवसापूर्वी भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एकमेकांच्या माजी नगरसेवकाना प्रवेश दिला होता. त्यामुळे याठिकाणचे वातावरण चांगलेच तापले होते. हा वाद दिल्लीपर्यंतही गेला होता. त्यातच आता योगेंद्र भोईर यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे आता डोंबिवलीतील राजकारण बदलताना दिसणार आहे.
बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्याप्रमाणे प्रगतीसाठी आपल्याला नेहमीच स्वतःमध्ये बदल करत राहावे लागतात. माझ्या आयुष्यतील कठीण असा निर्णय मला आज घ्यावा लागला तो म्हणजे भाजप परिवारामधून आज मी बाहेर पडलो आहे. माननीय रवींद्र चव्हाण साहेब माझे दादा यांच्या मागर्दर्शनाखाली नेहमीच नवनवीन गोष्टी आयुष्यात शिकायला मिळाल्या. त्यांचा सहवास मला माझ्या राजकीय वाटचालीमध्ये लाभला हा आनंद कायम मला प्रेरणा देत राहील, मात्र ते म्हणतात ना कुठे पोहचायचं असेल तर कुठून तरी निघावं लागत म्हणूनच माझ्या वैयक्तीत पातळीवर निर्णय घेऊन मी भाजपची साथ सोडत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये माझी राजकीय वाटचाल सुरु ठेवणार आहे.’ असे ट्विट योगेंद्र भोईर यांनी केले आहे.


