अविनाश जाधव यांचा परप्रांतीयांना इशारा !
ठाण्यात दोन रिक्षा चालकांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याविषयी अपशब्द काढले होते. या संदर्भाची एक चित्रफीत देखील प्रसारित होत आहे. यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दावा केला आहे की, त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन त्या रिक्षा चालकाला चोप दिला आहे.
तसेच त्यांनी परप्रांतीयांनाही इशारा देत राज साहेबांबाबत बोलाल तर तुमचे हात पाय तोडू असा इशारा दिला.
पोखरण रोड येथील गांधीनगर या भागातील शिवसेना शाखेजवळ दोन रिक्षा चालक धिंगाणा घालत असल्याचे चित्रीकरण प्रसारित होत आहे. त्यांच्याकडून भर रस्त्यात शिवीगाळ केली जात होती. त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याविषयी अपशब्द काढले. तसेच, मनसे पक्षाविषयी आक्षेपार्ह वक्तव्यय केले. या घटनेचे चित्रीकरण समाजमाध्यमावर मोठ्याप्रमाणात प्रसारित झाले. याबाबतची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी रिक्षा चालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु त्यापूर्वीच यातील एका रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.
अविनाश जाधव यांचा इशारा
या प्ररकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक पाचचे उपविभाग अध्यक्ष रवींद्र महाले यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर रिक्षा चालक शैलेंद्र यादव (३५) आणि राकेश यादव (२७) या दोघांविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडले होते. यातील शैलेंद्र याला पोलिसांनी अटक केली आहे. तर राकेश याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम १९६ (१) (अ), ३५२, ३५१ (२) आणि ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान अविनाश जाधव यांनी थेट इशारा दिला आहे. अविनाश जाधव हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह चितळसर पोलीस ठाण्यात पोहचले होते. अविनाश जाधव म्हणाले की, रिक्षा चालकाने साहेबांबाबत वाईट शब्द वापरले. त्याला सकाळपासून आम्ही शोधत होतो. आम्ही त्याच्या घरापर्यंत पोहचलो. परंतु आम्ही पोहचण्याच्या दोन मिनीटांपूर्वी पोलीस त्याच्या घरी पोहचले होते. त्यामुळे तो पोलिसांच्या ताब्यात मिळाला. त्याला चितळसर पोलीस ठाण्यात आणले. आम्ही महाराष्ट्र सैनिक चितळसर पोलीस ठाण्यामध्ये शिरुन त्याला चोप दिलेला आहे असे ते म्हणाले.
तर हात पाय तोडू
महाराष्ट्रात माज दाखवू नका, निवडणूका येतील जातील. पण आमचा विजय राजसाहेब आहेत आणि पराभव पण राजसाहेब आहेत. साहेबांबद्दल कोणी बोलायचा प्रयत्न केला. तर त्याचे हात-पाय तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. त्यामुळे उरलेले जेवढे भैय्ये आहेत, युपी, बिहारचे नागरिक आहेत त्यांनी राजसाहेबांबद्दल बोलायची हिमंत केली तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही असेही जाधव म्हणाले.


