ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांनी शिवबंधन तोडलं…
कोकणात सध्या नगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून येथील रत्नागिरी जिल्ह्यात महायुती असो किंवा महाविकास आघाडीत अलबेल असल्याचे दिसत नाही. काही ठिकाणी भाजप विरूद्ध शिवसेना असा सामना रंगलेल्या दिसत असून काही ठिकाणी शिवसेना विरूद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे. यामुळे महायुतीत फूट पडल्याचे दिसत आहे. तर महाविकास आघाडीत देखील असाच वाद असून चिपळूणमध्येतर हा वाढलेला दिसत आहे. येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्याशी फारकत घेत पक्षाविरूद्ध बंड पुकारले आहे. जो राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडल्याचे आता दिसत आहे. चिपळूणमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी शिवबंधन तोडले आहे. ज्यामुळे येथे शिवसेनेला खिंडार पडले आहे.
नुकताच भास्कर जाधव यांनी, चिपळूणच्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या टप्प्यातील चर्चेत राष्ट्रवादीसोबत जागांच्या वाटाघाटीचा तिढाही सोडवून घेतला होता. मात्र मी येथे नसताना अचानक चर्चा थांबवल्या. याचे कारण मला अद्याप कळू शकलेले नाही, असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच आपण रमेश कदम यांना शब्द दिला असून परिणामांची चिंता न करता कदम यांचा प्रचार करणार असल्याचेही भास्कर जाधव यांनी म्हटले होते. त्यामुळे माजी खासदार विनायक राऊत यांच्यात आणि भास्कर जाधव यांच्यात दुरावा आल्याचे समोर आले होते.
यानंतर दोनच दिवसांत येथे मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून कोकरे जिल्हापरिषद गटात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. येथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जोरदार धक्का दिला असून गत कित्येक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या असुर्डे बनेवाडी येथील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेनेचे शिवबंधन तोडत राष्ट्रवादीत सोमवारी जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता शिवसेनेसाठी जोरदार धक्का मानला जात आहे. तर ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रवेश घडल्याने राष्ट्रवादीला मजबूत बळ प्राप्त झाले असून शिवसेनेमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
सध्या जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकींच्या रणधुमाळीला जोरदार सुरूवात झाली आहे. आतापर्यंत येथे महायुतीतील घटक पक्ष भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेनं राष्ट्रवादीची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. येथे मोठे पक्ष प्रवेश याआधीच झाले आहेत. ज्यामुळे राष्ट्रवादीला जोरदार धक्के लागले होते. पण आता आमदार शेखर निकम यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीला विशेष महत्व देत काम सुरू केले आहे.
याचीच सुरवात कोकरे जिल्हापरिषद गटात पाहायला मिळाल्या असून गत अनेक वर्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी बांधील असणारे असुर्डे बनेवाडी येथील शेकडो ग्रामस्थांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे दोनशे ते अडीचशेचे एक गठ्ठा मते आता राष्ट्रवादीला जोडली गेली आहेत.
यावेळी शेखर निकम यांनी बनेवाडी उबाठा शिवसैनिकांचे जोरदार स्वागत करताना सांगितले की, तुम्ही या पूर्वीच माझ्यासोबत हवे होतात. मात्र ठीक आहे आलात हे महत्वाचे आहे. तुमच्या सुखदुःखासह विकास कामात मी तुमच्या सोबत कायम असेल मला तुम्ही या पूर्वी ही जवळचे वाटत होतात आणि आता तर माझ्या कुटूंबातील तुम्ही झाला आहात असे स्पष्ठ केले. तसेच वाडीच्या विकासासाठी गावच्या विकासासाठी तुम्हाला लागेल तेवढा निधी मी उपलब्ध करून देईल असा शब्द निकम यांनी दिला आहे.


