महायुतील वादावर भाजपच्या बड्या नेत्याची थेट प्रतिक्रिया !
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी महायुती मधील मित्रपक्ष एकामेकांविरोधात मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या मैदानात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. या आरोपांमुळे महायुतीच्या मित्र पक्षांमध्ये सुरू असलेला वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, राज्यातील बहुतांश ठिकाणी आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढत आहोत. त्यामुळे जनतेमध्ये उत्साह आहे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच डबल इंजिन सरकार महाराष्ट्रामध्ये विकास करू शकत हे जनतेला ठाऊक आहे.
आज महाबळेश्वर, वाई, शिरूर आणि उपरी येथे दौरा केला जनतेमध्ये प्रचंड उत्साह दिसला असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुती दोन तृतीयांश बहुमताने निवडून येईल असा मला विश्वास आहे.
पालिका आणि नगरपंचायत निवडणुकीपूर्वी महायुतीच्या समन्वय समितीमध्ये चर्चा झाली होती. त्यानुसार ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे महायुतीत निवडणूक लढवायच्या आणि जिथे शक्य नसेल त्या ठिकाणी मित्र पक्ष म्हणून कोणतीही टीका टिपणी, वाद विवाद न करता कोणतेही मतभेद आणि मनमेद होणार नाही याचा विचार करून निवडणूक लढवायचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मनभेद आणि मतभेद होणार नाही या पद्धतीनेच आम्ही निवडणुका लढवत असून महाराष्ट्रातील युती सरकारमध्ये कोणतीही मतभेद नाहीत.
मात्र स्थानिक लेवलवर जर काही मनभेद आणि मतभेद झाले असतील तर आम्ही पालिका आणि नगरपंचायतीचा निकाल लागल्यानंतर म्हणजेच तीन तारखेनंतर समन्वय समितीचे नेते एकत्र बसून ते मतभेद सोडून सर्व कार्यकर्त्यांचं मनोमिलन करू असं बावनकुळे म्हणाले.
स्थानिक निवडणुकीमध्ये नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यामध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपण बाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, प्रत्येकाला प्रचार करण्याचा आणि प्रचार सभा घेण्याच्या अधिकार आहे. त्या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात मतभेद झाले असतील तर दोन तारखेनंतर आम्ही बसून ते सोडू. कुठलेही वाद टोकाला जाऊ नये याची काळजी आम्ही घेणार आहोत. तो वाद मिटवण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचं बावनकुळे म्हणाले.


