ठाणे-प्रतिनिधी नागेश पवार
दिवा:- ठाणे महानगरपालिके मार्फत 20 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. परंतु याद्या जाहीर झाल्यानंतरही 24 नोव्हेंबरपर्यंत वार्ड क्रमांक 27 व 29 यांच्या याद्या उपलब्ध करण्यात प्रशासन अपयशी ठरले, ही अत्यंत गंभीर आणि लोकशाही प्रक्रियेचा अवमान करणारी बाब आहे.
याचबरोबर, वार्ड क्रमांक 28 च्या याद्यांमध्येही मोठ्या प्रमाणात विसंगती समोर आल्या असून वार्ड क्रमांक 27 मधील “यादी क्रमांक 46” ही चुकून वार्ड क्रमांक 28 मध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
ही चूक केवळ तांत्रिक नसून निवडणूक प्रक्रियेच्या विश्वसनीयतेला धक्का देणारी आहे.
वार्ड 27 मधील मतदाराला चुकून वार्ड 28 मध्ये मतदान करावे लागणार.निवडून आलेला नगरसेवक त्या मतदाराच्या मूळ प्रभागातील प्रश्न सोडवू शकणार नाही.
प्रभागनिहाय लोकसंख्येचे संतुलन आणि प्रतिनिधित्व यांचा गंभीर बिघाड.
ही सर्व परिस्थिती पाहता, ठाणे महानगरपालिका प्रशासनाचा निष्काळजी आणि हलगर्जी कारभार स्पष्टपणे समोर येतो.
या वेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ऍड.रोहिदास मुंडे यांनी मागणी केले आहे की
प्रारूप मतदार याद्यांची छाननी करण्यासाठी किमान 15 दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ तात्काळ जाहीर करावी.
वार्ड 27 मधील चुकीने वार्ड 28 मध्ये टाकलेली “यादी क्रमांक 46” तात्काळ मूळ वार्ड 27 मध्ये पुनर्स्थापित करावी.
याद्यांमधील सर्व विसंगती तातडीने दुरुस्त करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कारवाईची लेखी नोंद घ्यावी.
लोकशाहीचा पाया म्हणजे अचूक आणि पारदर्शक मतदार यादी. परंतु ठाणे महानगरपालिकेच्या बेजबाबदार वर्तनामुळे नागरिकांचा विश्वास डळमळतो आहे. आम्ही या चुका तातडीने दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलावीत, अशी ठाम भूमिका व्यक्त करतो. यावेळी निवेदन देताना ऍड.रोहिदास मुंडे शहर प्रमुख सचिन पाटील विभाग प्रमुख चेतन पाटील उपस्थित होते.


