भाजपाला नवी चिंता; समोर विरोधक नाहीत म्हटल्यावर…
विरोधी पक्षांमधील बडे-बडे नेते राज्यभर फिरून प्रचाराचा धुरळा उठवत आहेत, असे चित्र नाही. हे नेते आपापल्या जिल्ह्यातील आणि त्यातही आपल्या मतदारसंघातील नगरपरिषदा आपल्याच ताब्यात कशा राहतील, यातच अडकले आहेत.
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर भाजप-महायुतीचा एकत्रितपणे जोरदार मुकाबला करण्याची महाविकास आघाडीची मानसिकता संपली. बिहारच्या निकालानंतर आणखीच निराशा आलेली दिसते. त्या मानाने भाजपचे किमान आठ-दहा मोठे नेते प्रचारात दिसतात. फडणवीस-शिंदे-पवार यांनी तर विधानसभेसारखी नगरपरिषदेची निवडणूक अंगावर घेतली आहे. तिकडे हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे तेवढे राज्यभरात फिरत आहेत. आता समोर विरोधक नाहीत म्हटल्यावर सत्तारूढ महायुतीतील तीन पक्षच एकमेकांचे विरोधक बनले आहेत. एकमेकांवर छान प्रेम करणारे नवरा-बायको आणि एकमेकांशी कडकडून भांडणारे नवरा-बायको अशा दोन्ही भूमिका महायुतीतील पक्षच वठवत आहेत.
सिनेमात आपण अनेकदा डबल रोल पाहिला, सध्या तो महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे. डबल रोलचे सिनेमे कधी हिट होतात, कधी फ्लॉप होतात; पण यावेळचा ट्रेलर पाहता तो हिट होईल, असे दिसत आहे. ‘आपसात लढा आणि मोठे व्हा,’ असा नवीन फाॅर्म्युला महायुतीने आणला आहे. प्रेम आणि भांडण एकाच फ्रेममध्ये बसवले जात आहे. शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी भाजपचा पैसा पकडल्याचा व्हिडीओ आणला, त्यावरून राणे बंधू एकमेकांशी भिडले आहेत. लंकादहनावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात कलगीतुरा रंगला. संदर्भ अर्थातच रामायणाचा आहे; पण भविष्यात महायुतीमध्ये ‘महाभारत’ घडले, तर त्याच्या मुळाशी असे ‘रामायण’च असेल. जवळचे फायदे गोड वाटतात, तेव्हा दूरच्या नुकसानीची पर्वा नसते. महायुतीत सध्या तेच चालले आहे.
ठाकरे बंधू मुंबईत अडकले?
उद्धव ठाकरे हे गुरुवारी ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरे यांना भेटले, दोघांनी चर्चा केली. महाराष्ट्रात नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, त्यापासून ठाकरे बंधू दूरच दिसतात. त्यांच्यासाठी अर्थातच महापालिका महत्त्वाची आहे. मुंबईतील ताकदीचा विस्तार करण्यासाठीची रणनीती आखताना राज्याच्या इतर भागांत होत असलेल्या संकोचाची चिंता महत्त्वाची वाटत नसावी. नगरपरिषदेनंतर जिल्हा परिषद निवडणुकीकडेही असेच दुर्लक्ष झाले, तर पक्ष मुंबईसह काहीच मोठ्या शहरांपुरता मर्यादित राहण्याची भीती आहे; पण मुंबई हातात आली की पुन्हा राज्यात विस्तारता येईल, हा विचार असावा आणि त्यातूनच नगरपरिषदांमधील प्रचार जोमात असताना दोघांनी मुंबई महापालिकेवरच लक्ष केंद्रित केले असावे. उद्धव ठाकरे यांनी महापालिकेवर लक्ष केंद्रित करावे आणि आदित्य ठाकरे यांनी नगरपरिषदांमध्ये झोकून द्यावे, अशी विभागणी करता आली असती; पण मुंबई महापालिकेपेक्षा आणखी काही दिसत नसावे कदाचित. ‘ठाकरे म्हणजे महाराष्ट्र’ याऐवजी ‘ठाकरे म्हणजे मुंबई’ हे जास्त महत्त्वाचे वाटत असावे का? परीक्षेत चांगले गुण मिळवायचे तर सगळे पेपर सोडवावे लागतात. केवळ एकच पेपर दिला आणि समजा, त्यात उत्कृष्ट गुण मिळाले तरी शेरा ‘नापास’चाच येईल ना?
राज यांच्याबाबत कसे?
राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही, यावरून सध्या खल चालला आहे. काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांची तशी इच्छा नाही. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही काँग्रेस स्वबळावर हवी आहे. २०२९ च्या विधानसभेपर्यंत पंजा सगळीकडे पोहोचला पाहिजे, हा फारच व्यापक विचार सपकाळ करत आहेत. एक अंदाज असा आहे की, भाजप-महायुतीचा मुकाबला एकेकट्याने करता येत नाही, तेव्हा ‘मविआ’ने एकत्र यायला हवे आणि त्यातही राज ठाकरे यांना सोबत घ्यायला हवे, असा विचार नगरपरिषद निवडणूक निकालाची आकडेवारी पाहता प्रकर्षाने ‘मविआ’तच बोलून दाखविला जाईल. राज ठाकरेंची वैचारिक भूमिका मान्य नाही वगैरे वर्षा गायकवाड बोलत आहेत. हे वैचारिक वगैरे काही नसते ताई! ‘मविआ’चे सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी आणि चक्क शिवसेना असे मिळून बनले होतेच ना! शिवसेनेला सोबत घेतले तर हिंदी पट्ट्यात काँग्रेसला फटका बसेल, या तर्काची कोणतीही पर्वा न करता उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आले. आता तर हिंदी पट्ट्यात नुकसानाचीही भीती नाही; कारण ते आधीच खूप झालेले आहे. विचारसरणीचे काय? एकदा सत्ता मिळाली की विचारसरणीला सोफ्यावर बसवता येते. २०१९ मध्ये तसेच घडले होते ना!
भाजपची नवी चिंता
इतर पक्षांमधून भाजपमध्ये इतके लोक आले, की ‘मूळचे कमी अन् बाहेरचे जास्त’ अशी स्थिती झाली. पक्षात राष्ट्रीय स्तरावर याबद्दल चिंता आहे. वैचारिक बांधिलकी मानणारे लोक कमी होत गेले तर एक दिवस भाजपचा मूळ विचारच लुप्त होईल, ही ती चिंता. त्यावर तोडगा म्हणून अभाविप आणि संघामध्ये काही वर्षे काम केल्याने ज्यांची वैचारिक बैठक पक्की झाली आणि जे पक्षामध्ये नाहीत, अशांना पक्षात सक्रिय करण्याची एक मोहीम हाती घेण्यात आली आहे. लवकरच त्याचे दृश्य परिणाम दिसतील कदाचित!


