इगतपुरी प्रतिनिधी : विकास पुणेकर
इगतपुरी : नाशिक–मुंबई महामार्गावर मुंढेगाव परिसरात पहाटेच्या सुमारास थरारक दरोड्याची घटना घडली आहे. इंदूरवरून मुंबईकडे निघालेल्या स्कॉर्पिओ वाहनाला मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीसमोरील रेल्वे पुलावर अडवून चालकास मारहाण करीत दरोडेखोरांनी साडेचार लाख रुपयांची रोकड लुटली. या प्रकरणी वाडीव-हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी धर्मेंद्र पटेल (वय ४८, रा. सुरत, गुजरात) हे किरण पटेल यांच्याकडे चालक म्हणून काम करतात. ते ग्वाल्हेर येथून मालकाचे सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी साडेचार लाख रुपये घेऊन स्कॉर्पिओ (क्रमांक DL 7 CS 4106) मधून मुंबईकडे येत होते. पहाटे सुमारे साडेपाचच्या दरम्यान मुंढेगावजवळील जिंदाल कंपनीसमोरील रेल्वे पुलावर इनोव्हा वाहन आडवे लावून दरोडेखोरांनी स्कॉर्पिओ अडवली.
दरोडेखोरांनी चालक धर्मेंद्र पटेल व त्यांच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीस मारहाण केली. त्यानंतर स्कॉर्पिओ वाहन नाशिकच्या दिशेने वळवून राजूर फाट्याजवळील गुरुद्वाराच्या पाठीमागील परिसरात नेले. तेथे स्कॉर्पिओतील साडेचार लाख रुपयांची रोकड लुटून दरोडेखोरांनी पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच वाडीव-हे पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरलेकर व उपअधीक्षक हरिष खेडकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. फॉरेन्सिक व्हॅन व डॉग स्कॉडच्या मदतीने तपास सुरू असून, स्थानिक गुन्हे शाखेकडूनही समांतर तपास करण्यात येत आहे.
