जळगाव जामोद प्रतिनिधी (विनोद वानखडे):-
कुरणगाड (ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) येथे शासन निर्देशानुसार 26 जानेवारी 2026 रोजी होणे आवश्यक असलेली ग्रामसभा अद्याप घेण्यात आलेली नाही. तसेच आजतागायत कोणतीही नियमित ग्रामसभा ग्रामपंचायतीकडून आयोजित करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामसभा न झाल्यामुळे गावातील नागरिकांना शासकीय योजना, विकासकामे, खर्चाचा हिशेब, तक्रारी व सूचना मांडण्याचा मूलभूत अधिकार डावलला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हे ग्रामपंचायत अधिनियम व शासन निर्णयांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी रहिवासी सतीश नारायण भारसाकळे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, सरपंच व सचिव यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्याची तसेच तात्काळ ग्रामसभा घेण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.
ग्रामसभा ही गावाच्या विकासाची लोकशाही बैठक असून ती जाणीवपूर्वक टाळणे म्हणजे नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणण्यासारखे आहे. प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
