जळगांव जामोद प्रतिनिधी (विनोद वानखडे) :-
वंचित बहुजन आघाडी जळगांव जामोद च्या वतीने दि १६ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना मा.उपविभागिय अधिकारी राजस्व विभाग यांचे मार्फत निवेदन देऊन १४ फेब्रुवारी रोजी घडलेल्या विटंबना प्रकरणातील आरोपी समाजकंटक राहुल लांडे मनुवादी विचारसरणीच्या व्यक्तीने जे कृत्य केले त्याचा निषेध आणि आरोपीची नार्को टेस्ट करण्यात यावी आणि नगरपरिषद ने
लावलेले सि सि टि व्हि कॅमेरे लावले असतांना दोन दिवस आधीच बंद कसे काय होते तसेच आरोपीच्या मोबाईल चा सिडिआर काढुन तसेच ज्या दिवशी प्रकरण घडले त्या दिवसभराचे आरोपिचे सि सि टि व्हि फुटेज काढण्यात यावे आणि आरोपिचा कर्ता करविता कोण आहे याकरिता उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशा विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा महासचिव आतिशभाई खराटे, तालुका अध्यक्ष देवानंद दामोदर, महिला अध्यक्षा विशाखाताई सावंग, रतन नाईक, सुनिल बोदडे, ad संदिप उगले, अरुण पारवे, नगरसेवक डॉ सलिम शेख,सुनिता हेलोडे, प्रशांत अवसरमोल, बौद्ध महासभेचे जगदिश हातेकर ,विजय तायडे,आजम कुरेशी,मंगला पारवे,सोनम वानखडे, गुलाबराव आठवले,सुदाम गवई, अमोल तायडे , संतोष भारसाकळे, साहेबराव जाधव,संघपपाल गुरचळ, रोशन तायडे,अक्षय वाकोडे,नारायण पवार, गौतम पवार,नरेश पवार प्रमोद कोकाटे,अताऊल्ला खान, यांसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते महिला, पुरुष उपस्थित होते.
——————–
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जळगाव जामोद संविधान चौक येथे असलेल्या स्मारकामधील पुतळ्याची झालेली विटंबना हा प्रत्येक संवेदनशील नागरिकांच्या मनाला चटका लावणारा आणि समाजाच्या सामूहिक विचारांना अस्वस्थ करणारा प्रसंग आहे. समाजाच्या अस्मितेवर घाव घालण्याचा हा प्रयत्न असला, तरी बाबासाहेबांच्या विचारांचे तेज इतके प्रखर आहे की अशा विघातक कृत्यांनी त्या महान विचारांचा गौरव कधीच तीळ मात्र ही कमी होऊ शकत नाही.
पोलीस प्रशासनाने अत्यंत तत्परतेने आरोपीला अटक करून न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ केला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. मात्र, आरोपीला मानसिक रुग्ण म्हणून दाखविण्याचा प्रयत्न झाल्यास या कृत्यामागील खरे सूत्रधार कधीच उघडकीस येणार नाहीत. या विटंबनेमागील अदृश्य प्रवृत्ती, जातीय तेढ वाढविणारे स्वार्थी हेतू आणि समाजात अस्थिरता पसरवू पाहणाऱ्या शक्ती यांचा शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करणे ही आजची अत्यावश्यक गरज आहे.
अशा संवेदनशील प्रसंगी समाजाने शांतता, संयम आणि बंधुत्व जपणे अनिवार्य आहे. आज सकाळी बाबासाहेबांच्या अनुयायांनी दाखवून दिलेल्या शांतीच्या भूमिकेचे कौतुक करावे तेवढे कमी आहे; पुढेही हीच एकता टिकवून ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. जात–धर्माच्या पलीकडे जाऊन प्रशासनावर विश्वास ठेवत एकत्र उभे राहिल्यास समाजाची खरी ताकद अधिक दृढ होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली न्याय, समानता, स्वाभिमान आणि बंधुता ही मूल्ये आपल्या देशाचे खरे आत्मसामर्थ्य आहेत. कोणत्याही विटंबनेने या मूल्यांना तडा जाऊ शकत नाही. त्यामुळे “या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन या कृत्यामागील सर्व संबंधित व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यासाठी पावले उचलावे , जेणेकरून अशा विटंबनात्मक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायद्याचा धाक दृढ होईल. समाजाची शांतता, एकता आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी हे पाऊल अत्यावश्यक आहे.”
— प्रशांत तायडे
रिपाई राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य
तथा
युवा जिल्हा अध्यक्ष, बुलढाणा
