दैनिक चालु वार्ता, इंदापूर प्रतिनिधी-बापू बोराटे
पुणे (इंदापूर):-इंदापूर तालुक्यातील सराटी गावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मनोज जगदाळे यांनी आज मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राच्या विठूमाऊली’ अशी भावनिक भावना व्यक्त करणारी विशेष फोटोफ्रेम भेट म्हणून प्रदान केली.
या प्रसंगी मनोज जगदाळे यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला.लोकसभा निवडणुकीच्या काळात आपण अजितदादांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. त्या आठवणी सांगताना ते भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. अजितदादांसोबतचे अनुभव, त्यांचे मार्गदर्शन आणि पक्षासाठीची निष्ठा यांची त्यांनी विशेष आठवण करून दिली.
यावेळी सुनेत्रा पवार यांनीही मनोज जगदाळे यांच्या कामाचे कौतुक करत, “अजितदादांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात त्यांच्या विचारांना आणि कार्याला पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,” असे स्पष्ट केले.
या भेटीला मनोज जगदाळे यांचा मित्रपरिवारही मोठ्या संख्येने उपस्थित होता. एकूणच ही भेट भावनिक, प्रेरणादायी आणि पक्षनिष्ठेची जाणीव करून देणारी ठरली.
