वैजापूर प्रतिनिधी / अरविंद पवार
वैजापूर तालुक्यातील अलापुरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिवजयंतीनिमित्त सोमवारी (दि.१६) सायंकाळी ७ ते रात्री १०:३० या वेळेत भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रात्रीच्या वेळी पार पडलेल्या या कार्यक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत, ऐतिहासिक प्रसंगांचे नाट्यरूपांतर आणि समाजप्रबोधनात्मक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिऊर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव रणखांब होते. प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम आणि पंचायत समिती सदस्य हूशेन शेख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित सादरीकरण करत उपस्थितांना इतिहासाची उजळणी करून दिली. त्यांच्या कलागुणांचे सर्वत्र कौतुक झाले. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणारा आणि पालकांसाठी अभिमानास्पद असा हा सोहळा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण व्यवहारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक विजय आवारे, मोसीन शेख, विशाल गाडेकर, शिक्षिका आर्चना पवार, रूपाली खांडगौरे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. शालेय समिती अध्यक्षा अश्विनीताई जाधव यांच्या पुढाकारातून शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे.
यावेळी माजी मुख्याध्यापक शिवाजी जाधव, आर. आर. जाधव, उपाध्यक्ष हरीभाऊ मुळे, उपसरपंच अंकुशराव पाटील, बाळनाथ मुळे, पोलिस पाटील भावलाल पगारे, गणेश पगारे, नानासाहेब जाधव, रत्तन पगारे, नामा जाधव, रघुनाथ पगारे, अजिनाथ गुजर, मोबीन शेख यांच्यासह पालक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह) करण्यात आले असल्याने गावाबाहेरील नागरिकांनीही ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक बाळकृष्ण व्यवहारे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय आवारे यांनी मानले. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत अशा दर्जेदार व शिस्तबद्ध कार्यक्रमाचे आयोजन होणे ही कौतुकास्पद बाब असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेचा हा पुढाकार प्रेरणादायी ठरत आहे.
