पालघर प्रतिनिधी : मिलिंद चुरी
पालघर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी कुडण येथील साक्षात्कार मैदानावर विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. सावराई गावातील शिवभक्त चेतन राऊत यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदा नववे वर्ष होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी कुडण साक्षात्कार मैदान येथे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शिवरायांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता साक्षात्कार मैदान येथून कुडण गावातील युवकांनी सहभाग घेत भव्य बाईक रॅली काढण्यात आली. ही रॅली तारापूर (भंडारआळी) येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पोहोचली. तेथे स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कुडण गावातील रुपेश पाटील व प्रणय म्हात्रे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला. तसेच तारापूर गावातील युवा ॲड. कौशिक बर्वे यांनी शिवगर्जना करत परिसर शिवमय केला. आपल्या ओजस्वी भाषणातून त्यांनी तरुण पिढीला व्यसनांपासून दूर राहण्याचा मोलाचा सल्ला देत समाजप्रबोधनाचा संदेश दिला.
यानंतर साक्षात्कार मैदानावर ‘फ्रेंडशिप क्रिकेट’ सामन्यांना प्रारंभ झाला. बालगोपाल तसेच पंचक्रोशीतील तरुणांचा मोठा सहभाग या कार्यक्रमाला लाभला. मैदानावर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमास कुडण ग्रामपंचायत सदस्य राहुल ठाकूर, निकिता पाटील तसेच तारापूर ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, विनायक जाधव,संदेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते तुषार किणी उपस्थित होते.
समारोपावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शिवप्रेमींनी एकत्र येऊन पुढील वर्षी यापेक्षा अधिक मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच व्याख्यान व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करून शिवरायांचे विचार आणि कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रा.हि. सावे विद्यालयाचे शिक्षक मगन वळवी सर यांनी अत्यंत प्रभावी आणि ओघवत्या शैलीत पार पाडत संपूर्ण कार्यक्रमाला सुसूत्रता दिली; तसेच मनोगतपूर्ण आभार प्रदर्शनातून त्यांनी उपस्थितांचे मन जिंकले.
