दैनिक चालू वार्ता धाराशिव/प्रतिनिधी -समीर मुल्ला
कळंब : सध्या दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांचा कालावधी सुरू असताना शहरातील अनेक भागांमध्ये अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्मार्ट मीटर प्रणालीमुळे थकबाकी असलेल्या ग्राहकांची वीज ऑनलाइन पद्धतीने खंडित होत असल्याने मंगळवारपासून सुमारे २०० च्या वर घरांचा अंधार कायम असल्याची माहिती पुढे आली आहे.
महावितरणकडून बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरबाबत सुरुवातीपासूनच नागरिकांनी शंका उपस्थित केली होती. मात्र आता परीक्षेच्या ऐन काळात वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर थेट परिणाम होत आहे. अनेक विद्यार्थ्यांना दिव्याच्या उजेडात किंवा शेजाऱ्यांकडे जाऊन अभ्यास करावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
“माझे दहावीचे पेपर सुरू आहेत. अभ्यासाचा ताण आधीच आहे. त्यात वीज नसल्याने रात्री अभ्यास करणे कठीण झाले आहे,” असे एका विद्यार्थ्याने सांगितले. तर दुसऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याने, “शेवटचे काही पेपर बाकी असतानाच घरची वीज खंडित झाली. याचा थेट परिणाम निकालावर होऊ शकतो,” अशी चिंता व्यक्त केली.
महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, थकीत बिलामुळे ऑनलाइन प्रणालीद्वारे वीजपुरवठा तात्पुरता खंडित होत असल्याचे सांगण्यात आले. पूर्ण बिल भरल्यानंतर तत्काळ वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. मात्र अचानक खंडित झालेल्या वीजेमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, विशेषत: परीक्षेच्या काळात सवलत द्यावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी महावितरणने मानवी दृष्टीकोन ठेवून किमान परीक्षेच्या कालावधीत वीज खंडित करू नये, अशी मागणी केली जात आहे. या प्रकारामुळे स्मार्ट मीटर प्रणालीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मी १४ जानेवारीला महावितरणाकडे चेक ने पैसे जमा केले आहेत ;परंतु महावितरणाने आपले खाते न बघताच त्यांनी माझा विज पुरवठा खंडित केला मी जवळपास दोन दिवस अंधारातच राहिलो .
– एक संतप्त ग्राहक
