उदय सामंत, राणे, ज्योती वाघमारे, गोगावले, म्हस्केंची टीम सज्ज…
मागील काही महिन्यांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. या निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला घवघवीत यश मिळाले.
त्यानंतर आता शिवसेनेत मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. एकनाथ शिंदेंनी आजी-माजी आमदार, खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना कामाला लावले आहे.
शिवसेनेकडून लोकसभा संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुख व सह संपर्क प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या मुंबई व ठाण्याची लोकसभेची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. मुंबईत त्यांच्यासोबत मंत्री योगेश कदम, माजी खासदार राहुल शेवाळे व आमदार निलेश राणे हेही असती
मंत्री उदय सामंत हे पुण्यासह मावळ व कोल्हापूरचे लोकसभा संपर्कप्रमुख असतील. खासदार नरश म्हस्के यांना भिवंडी व कल्याणचे संपर्कप्रमुख करण्यात आले आहे. नुकत्याच राज्यसभेची खासदारकी मिळालेल्या ज्योती वाघमारे यांनाही संधी देण्यात आली असून त्यांच्याकडे शिर्डी मतदारसंघ असेल. उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंकडे आलेल्या राजन साळवी यांच्यावरही अकोल्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
विभागीय संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या
दक्षिण कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क प्रमुख किरण सामंत असतील. मंत्री भरत गोगावले यांच्याकडे उत्तर कोकण विभागातील रायगड आणि पालघर, माजी आमदार दगडू सपकाळ यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरची जबाबदारी असणार आहे.
मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड आणि नांदेडचे संपर्कप्रमुख म्हणून मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदियाच्या संपर्कप्रमुखपदी माजी मंत्री दीपक सावंत, पूर्व विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीची जबाबदारी आमदार डॉ. मनिषा कायंदे आणि पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यांची जबाबदारी मंत्री संजय राठोड यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
