अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा धोका टाळण्यासाठी आता जागतिक स्तरावर हालचाली वेगवान झाल्या आहेत. या संघर्षात शांतता प्रस्थापित करण्यासाठी इराणने पाकिस्तानचा प्रस्ताव फेटाळून लावत भारताला आपला सर्वात विश्वासू मित्र मानले आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव निवळण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे संकेत इराणकडून मिळाले आहेत.
पाकिस्तानचा १५ कलमी प्रस्ताव धुडकावला –
पश्चिम आशियातील तणाव निवळण्यासाठी पाकिस्तानने एक १५ कलमी शांतता प्रस्ताव इराणसमोर मांडला होता. मात्र, इराणने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. पाकिस्तानची भूमिका अनिश्चित असून, ते केवळ या संभाव्य कराराचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका इराणला आहे. पाकिस्तानचे अमेरिकेसोबत असलेले जवळचे संबंध पाहता, इराण त्यांच्या निष्पक्षतेवर शंका उपस्थित करत आहे.
भारतच का आहे इराणचा ‘भरोसेमंद’ साथी?
इराणी सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराण भारताला एक जवळचा आणि विश्वासार्ह देश मानतो. याचे मुख्य कारण म्हणजे, भारत आणि इराणचे संबंध ऐतिहासिक काळापासून संतुलित राहिले आहेत. ऊर्जा, व्यापार आणि कनेक्टिव्हिटी क्षेत्रात दोन्ही देशांचे धोरणात्मक सहकार्य आहे, ज्यामध्ये चाबहार बंदर मैलाचा दगड ठरले आहे. जर अमेरिकेसोबत चर्चा पुढे सरकली, तर भारत त्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा विश्वास इराणने व्यक्त केला आहे.
पाकिस्तानचा ‘शांतीदूत’ बनण्याचा केविलवाणा प्रयत्न –
दुसरीकडे, पाकिस्तान स्वतःला ‘शांतीदूत’ म्हणून प्रस्थापित करण्यासाठी सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्त यांसारख्या मुस्लिम देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करत आहे. पाकिस्तानने अमेरिका-इराण चर्चेसाठी ‘इस्लामाबाद’ हे ठिकाणही सुचवले होते. मात्र, इराणने त्यांच्यावर अविश्वास दाखवल्याने पाकिस्तानच्या या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.
बदलती कूटनीतिक समीकरणे –
इराणने पाकिस्तानला बाजूला सारून भारतावर दाखवलेला विश्वास ही जागतिक राजकारणातील मोठी घडामोड मानली जात आहे. सध्या इराणने अमेरिकेसोबतच्या चर्चेबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र, आगामी काळात जर कूटनीतिक चर्चेला सुरुवात झाली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार यात कशा प्रकारे मध्यस्थी करते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
