होर्मुझ संदर्भात केलं मोठं विधान…
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) जहाजांची वाहतूक प्रचंड मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. यामुळे संपूर्ण जागावरच ऊर्जा संकट पसरले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणातून हात झटकल्यानंतर आता चीनने मध्यस्थीसाठी पुढाकार घेतला आहे. होर्मुझमध्ये शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी आपण सर्व संबंधित पक्षांशी चर्चा करत आहोत, असे चीनने गुरुवारी स्पष्ट करण्यात आले.
यासंदर्भात बोलताना चीनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग म्हणाल्या, “होर्मुझ समुद्रधुनी आणि आसपासच्या सागरी क्षेत्रात लवकरात लवकर युद्धविराम होणे ही आंतरराष्ट्रीय समुदायाची सामायिक इच्छा आहे. यासाठी सर्वच पक्षांनी काम करायला हवे. यासंदर्भात चीन सर्व पक्षांशी संपर्कात आहे. या संघर्षासाठी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केली ‘बेकायदेशीर’ लष्करी कारवाईच कारणीभूत आहे.” तसेच, लष्करी बळाचा वापर करून या समस्येचे मूळ निराकरण होऊ शकत नाही आणि संघर्ष वाढणे कोणाच्याही हिताचे नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे, चीन आणि पाकिस्तान या आठवड्यात पाच-कलमी प्रस्तावाला प्रोत्साहन देण्यास सहमत झाले आहेत. यात शांतता चर्चा लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्याची आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी समाविष्ट आहे. यापूर्वी, “आम्हाला होर्मुझ मार्गाची काहीही गरज नाही. ज्या देशांना याची गरज आहे. त्यांनी याचे संरक्षण करायला हवे,” असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.
