प्रतिनिधी / स्वाती हडकर
चिपळूण : शहरातील मार्कंडी परिसरातील वन विभागाच्या कार्यालयाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या कंपाऊंड वॉलवर भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘कमळ’ रंगवण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. शासकीय मालमत्तेवर राजकीय पक्षाचे चिन्ह लावणे नियमबाह्य असल्याचा आरोप करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
मुख्य रस्त्यालगत असलेल्या या भिंतीवर काही भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे चिन्ह रेखाटून रंगरंगोटी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नगरसेवक गटनेते साजिद सरगुरोह, नगरसेविका सफा गोटे आणि सुरेश पाथरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत स्पष्टीकरण मागितले.
“सरकारी जागेचा राजकीय वापर कसा केला जातो?” असा सवाल उपस्थित करत काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांनी निवेदनाद्वारे तीव्र निषेध नोंदवला आहे. शासकीय मालमत्ता ही सार्वजनिक असून तिचा कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी किंवा प्रतीकात्मक वापरासाठी उपयोग करणे अयोग्य व नियमबाह्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकारामुळे प्रशासनाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाल्याचेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित राजकीय चिन्ह तात्काळ हटवून सखोल चौकशी करावी, जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी आणि भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विकासकामाच्या भूमिपूजन फलकावर भाजप जिल्हाध्यक्षांचे नाव समाविष्ट करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग तसेच नगरसेवक साजिद सरगुरोह यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या प्रकारावर जोरदार आक्षेप घेतल्याने तो मुद्दा चांगलाच गाजला होता. हे प्रकरण अद्याप पूर्णपणे शांत झाले नसतानाच आता भाजपच्या पक्षचिन्हावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती समोर येत आहे.
