मुंबई महानगरपालिकेने वरळी परिसरातील एक अत्यंत मोक्याचा भूखंड एका मर्जीतील विकसकाला पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठी कवडीमोल दरात देण्याचा प्रस्ताव मांडला आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केला.
तसेच त्यांनी या भूखंडाचा लिलाव थांबवण्याची मागणी केली आहे. गायकवाड यांनी आरोप केला की, वरळीतील हा मोक्याचा भूखंड पंचतारांकित हॉटेलसाठी दिला जात आहे. या लिलावाची प्रक्रिया तात्काळ थांबवा. या भूखंड व्यवहारात कोट्यावधीचा घोटाळा झाला आहे.
भाजप पक्ष मुंबईची विक्री करत आहे. जेव्हापासून या पक्षाने महानगरपालिकेच्या प्रशासनावर नियंत्रण मिळवले आहे, तेव्हापासून पालिकेचे मोक्याचे भूखंड विक्रीसाठी काढले जात आहेत.वरळीतील एका महत्त्वाच्या ठिकाणी असलेला ५,१६६ चौरस मीटरचा भूखंड एका मर्जीतील विकसकाला ४५५ कोटी रुपयांना देण्याचा प्रस्ताव आहे.
ही किंमत बाजारभावापेक्षा खूपच कमी आहे. हा भूखंड अत्यंत कवडीमोल दरात दिला जात आहे, ज्यामुळे महानगरपालिकेचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. यामुळे विकसकांचा तसेच सत्तेत असलेल्यांचा फायदा होत आहे, असा आरोप त्यांनी महानगरपालिका आयुक्त आणि महापौर यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात केला आहे.
त्यांनी दावा केला की, या व्यवहाराच्या अटी-शर्ती पाहता त्या विशिष्ट विकसकांच्या फायद्याच्या असल्याचे दिसून येते. यातून विकसक प्रचंड नफा कमावतील, मात्र महानगरपालिकेला मात्र आर्थिक नुकसान सोसावे लागेल. मोक्याच्या मालमत्तांचा अशा प्रकारे नियोजनशून्य लिलाव करण्याला काँग्रेसचा तीव्र विरोध आहे, असे गाकवाड म्हणाल्या.
