युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी पाकिस्तान फुल्ल तयारीत…
अमेरिका-इराणने युद्धादरम्यान दोन आठवड्यांची शस्त्रसंधी जाहीर केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याचं श्रेय पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असिम मुनीर यांना दिल्याने पाकिस्तानचे सत्ताधारी नेते सध्या उत्साहात आहेत.
भलेही चीनने शस्त्रसंधीसाठी आपणच प्रयत्न केले असल्याचं म्हटलं. तरी पाकिस्तान वेगळ्याच आनंदात आहेत. त्यातच आता इस्लामाबादमध्ये दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलीय.
अमेरिका आणि इराण यांच्यात होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या चर्चेसाठी इस्लामाबाद सज्ज झाले आहे. या हाय-प्रोफाइल बैठकीपूर्वी पाकिस्तान सरकारने अनपेक्षित पावले उचलली आहेत. इस्लामाबाद प्रशासनाने अचानक गुरुवार आणि शुक्रवार अशा दोन दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. जरी या सुट्टीचे अधिकृत कारण स्पष्ट केले नाही.
इस्लामाबादमधील ‘सेरेना हॉटेल’मध्ये ही बैठक होणार आहे, ते हॉटेल पूर्णपणे रिकामे करण्यात आले असून प्रशासनाने जारी केलेल्या सूचनेनुसार, ही सुट्टी केवळ इस्लामाबाद कॅपिटल टेरिटरीमध्ये लागू असेल. मात्र, पोलीस, रुग्णालय, वीज आणि गॅस यांसारख्या अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
या ऐतिहासिक बैठकीत अमेरिकेचे नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हॅन्स करणार आहेत, तर इराणकडूनही उच्चस्तरीय शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी १० एप्रिल २०२६ रोजी ही बैठक होणार असल्याची पुष्टी केली आहे. या चर्चेला ‘इस्लामाबाद टॉक्स’ असे नाव देण्यात आले असून, केवळ तात्पुरती शांतता नव्हे तर या संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे.
इराणचे राजदूत रझा अमिरी मोगदम यांनीही या शिष्टमंडळाच्या आगमनाबाबत माहिती दिली होती. या चर्चेची पार्श्वभूमी पाहता, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर परिस्थिती वेगाने बिघडली होती. इराणने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर हे युद्ध आखाती देशांपर्यंत पसरले आणि त्यात लेबनानमधील हिजबुल्लाहचीही एन्ट्री झाली. जागतिक युद्धाचा धोका निर्माण झालेला असताना तुर्की, इजिप्त, चीन, सौदी अरेबिया आणि कतार यांसारख्या देशांनी मध्यस्थीचे प्रयत्न केले. या प्रयत्नांमुळेच दोन आठवड्यांचा युद्धविराम शक्य झाला आहे.
