चव्हाण-शिंदे-कर्डिलेंची साद; विखेंचं काय?
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी न करणारे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे सध्या भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुडबुक’मध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंतराव पाटील यांच्या भाचा, प्राजक्त तनपुरे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह राहुरी विधानसभेसाठी पोटनिवडणूक लढवणारे भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले याचे पुत्र अक्षय कर्डिले उत्सुकता दाखवली आहे.
तनपुरेंविषयी भाजपच्या नेत्यांनी दाखवलेल्या या उत्सुकतेमुळे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी, ‘तनपुरेंसाठी भाजपची गाडी फुल आहे’, म्हटल्याचे काय होणार, याची देखील चर्चा आहे.
राहुरी (Rahuri) विधानसभा पोटनिवडणुकीत महायुती भाजपने प्रचाराचा धडाका लावला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल राहुरी मतदारसंघात सभा घेतल्या. भाजपच्या प्रचारात सर्वाधिक चर्चेत आहेत ते, प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)! भाजपचे सर्वच नेते, तनपुरेंना भाजपमध्ये पायघड्या घालताना दिसत आहेत.
भाजपमध्ये (BJP) प्राजक्त तनपुरे यांनी प्रवेश केल्यास त्यांचे स्वागतच आहे, असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी देखील तनपुरेच्या भाजप प्रवेशाचं स्वागत करू, असं म्हटलं आहे. उमेदवार अक्षय कर्डिले यांनी देखील मतदारसंघाच्या विकासासाठी तनपुरेंनी भाजपमध्ये यावं, असं विधान केलं आहे.
भाजप नेते एकीकडे प्राजक्त तनपुरे यांना भाजपमध्ये येण्याचं आमंत्रण देत असतानाच, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये येण्यास अनेकजण उत्सुक आहेत. पण भाजपची गाडी अगोदर फुल आहे, असे म्हटलं आहे. एकप्रकारे विखे पाटील यांनी तनपुरेंच्या भाजप प्रवेशाला पूर्वीच सूचक, असा विरोध केलेला आहे.
विखेंचं अन् तनपुरेंचं विधान चर्चेत
त्यामुळे भाजपच्या या नेत्यांच्या विधानाला कितपत अर्थ राहातो, तर विखे पाटील यांच्या विधानाला आगामी काळात वजन येते यावर भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांनी आपण महाविकास आघाडी सोडलेली नाही. भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. 2029च्या रणसंग्रामची महाविकास आघाडीकडून तयारी करणार आहोत, असे म्हटलं आहे.
निवडणुकीपुरती चर्चा
परंतु,भाजप नेत्यांमध्ये प्राजक्त तनपुरे यांना पक्षात घेण्याची चाललेली चढाओढ, ही निवडणुकीपुरती आहे की, आगामी काळात देखील त्यावर मंथन होणार आहे, याची देखील उत्सुकता आहे. राहुरीमधून भाजपला मताधिक्य हवे आहे. यासाठीच भाजपकडून तनपुरे यांच्या पक्षप्रवेशावर चर्चा घडवून आणल्या जात आहेत, असेही सांगितले जात आहे.
