अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पंजाबचे कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांना मोठा धक्का बसला आहे. अरोरा यांच्या निवासस्थानी आज पहाटे छापा टाकला आहे. आज एक पथक लुधियाना येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि बाहेर केंद्रीय पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले होते.
ईडीने मंत्री संजीव अरोरा यांच्या निवासस्थानासह इतर ठिकाणीही छापे टाकले. समोर आलेल्या माहितीनुसार, ही कारवाई एका जुन्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आणि जमिनीच्या व्यवहारांमधील कथित अनियमिततेच्या संदर्भात केली जात आहे.
गुरुग्राम, चंदीगड, लुधियाना आणि जालंधर येथे फेमा कायद्यांतर्गत तेरा जागांची झडती घेण्यात आली. यामध्ये संजीव अरोरा, हेमंत सूद आणि चंद्रशेखर अग्रवाल यांच्या निवासस्थानांचा आणि कार्यालयांचा समावेश होता.
आज अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आपल्या तपासाचा भाग म्हणून पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा आणि इतर अनेकांशी संबंधित जागांवर शोधमोहीम राबवली. एजन्सीचे अधिकारी लुधियाना आणि इतर अनेक ठिकाणी शोध घेत आहेत.
आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरोरा यांच्यावर २०२४ मध्ये ईडीने छापा टाकला होता. त्यावेळी ईडीने एका निवेदनात म्हटले होते की, अरोरा आणि इतर काही संस्थांशी संबंधित कंपन्यांनी औद्योगिक जमिनीचा निवासी प्रकल्पांसाठी गैरवापर करून राज्य सरकारचे नुकसान केले आणि अवैध नफा कमावला.
अशोक मित्तल यांच्या घरावरही ईडीचा छापा
बुधवारी, ईडीने आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्या जालंधर येथील निवासस्थानी आणि खाजगी विद्यापीठावर छापा टाकला. त्यांच्या घरावरील ईडीचा छापा आज सकाळी संपला, परंतु ईडी अजूनही त्यांच्या खाजगी विद्यापीठाची झडती घेत आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार
पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या नेत्यांवर ईडीकडून सुरू असलेल्या छाप्यांसंदर्भात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सकाळी १०:३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यापूर्वी, भगवंत मान यांनी राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्याशी संबंधित परिसरावर ईडीने टाकलेल्या छाप्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि सरकारवर टीका केली होती.
संजीव अरोरा कोण आहेत?
संजीव अरोरा हे एक प्रख्यात उद्योगपती मानले जातात. ते ‘रितेश इंडस्ट्रीज लिमिटेड’ नावाची एक निर्यात कंपनी चालवतात. त्यांनी अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे एक निर्यात कार्यालय उघडून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी २०२२ मध्ये राजकारणात प्रवेश केला.
आम आदमी पक्षाने त्यांना राज्यसभेवर उमेदवारी दिली. फेब्रुवारी २०२५ मध्ये, त्यांनी लुधियाना पश्चिम मतदारसंघातून विजय मिळवला. अरोरा हे अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या जवळचे मानले जातात.
