दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
कंधार : कंधार तालुक्यात स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, संघटनेच्या विस्ताराला आता वेग आला आहे. महाराष्ट्रभर संघटनेच्या कार्यकारिण्या स्थापन करण्याचे काम सुरू असताना कंधार तालुक्यातील कार्यकारिणीची जबाबदारी प्रणित कुमार यांच्या अध्यक्षतेखाली निश्चित करण्यात आली आहे.
नव्या कार्यकारिणीच्या स्थापनेनंतर सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने संकल्प केला असून, येणाऱ्या काळात पत्रकारांवरील अन्याय, सामाजिक घटकांवर होणारे अत्याचार, तसेच विविध समाजहिताच्या प्रश्नांवर स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ कंधार तालुक्यात ठामपणे आवाज उठवणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रश्न असोत किंवा समाजातील दुर्लक्षित घटकांवरील अन्याय असो, प्रत्येक विषयावर संघटना प्रभावीपणे उभी राहील, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला. कंधार तालुक्यात पत्रकारांना न्याय, सन्मान आणि सुरक्षित वातावरण मिळवून देण्यासाठी संघटना सक्रियपणे काम करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
अध्यक्ष प्रणित कुमार यांनी बोलताना सांगितले की, कार्यकारिणीतील काही रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत. उर्वरित पदांची निवड पूर्ण करून संघटनेची ताकद अधिक वाढवली जाईल.
तसेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व पदाधिकारी आणि सदस्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या बैठकीत संघटनेची उद्दिष्टे, भावी दिशा, कार्यपद्धती आणि कंधार तालुक्यात समाजोपयोगी कामे कशा प्रकारे राबवता येतील यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
कंधार तालुक्यात स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघाच्या स्थापनेमुळे पत्रकारांना नवे व्यासपीठ मिळाले असून, सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे लढा देणारी संघटना म्हणून नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.
